अमृता फडणवीस यांना सल्ला देणारी मी कोण : चित्रा वाघ

सरकारनामा विशेष कार्यक्रमात भाजपच्या महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची खास मुलाखत. पूर्ण मुलाखत सरकारनामाच्या यू ट्यूब व फेसबुक पेजवर 17 आॅक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता.
chitra wagh ff.jpg
chitra wagh ff.jpg

प्रश्न : भाजपमध्ये आल्याचा पश्चाताप होतो आहे का?

उत्तर : मी ज्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस सोडली त्याचे योग्य कारण मी शरद पवार आणि अजित पवार यांनी दिले. राष्ट्रवादीमध्ये असताना अजितदादा आणि पवार साहेब यांच्याकडून मला खूप शिकायला मिळाले तसे. मी कोणत्या पदाच्या अपेक्षेने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही.  भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन मिळते. काम करण्याची पूर्ण मोकळीक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडल्याचा अजिबात पश्चाताप होत नाही.

प्रश्न : महिला अत्याचारांच्या प्रश्नावर भूमिका घेताना पक्षीय अभिनिवेश महिला नेत्या घेतात. त्यामुळे आपल्या पक्षाचे सरकार असलेल्या राज्यात घटना घडल्या की त्यावर मौन बाळगले जाते. उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील घटनेबद्दल तुम्ही शांत का?

उत्तर : हाथरस ही घटना मानवजातीला काळिमा फसणारीच आहे .येथे कोणतेही पक्षीय वाद नाहीत .मी एका महिलेवर झालेला अत्याचार म्हणूनच पाहते यामध्ये दोषींना योग्य ती शिक्षाच मिळावी. पण यामध्ये दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे या विषयाला अनेक कंगोरे आहेत म्हणून आपण आत्ताच अंतिम विधान करू शकत नाही. पण राज्यात हिंगणघाट, जळगाव, औरंगाबाद या ठिकाणी अतिशय घृणात्मक प्रकारे बलात्कार झाला असताना येथे झालेले बलात्कार विसरून दुसऱ्या राज्याकडे बोट दाखवण्याचे काम राज्य सरकार करत आहे. त्याबद्दल आम्ही आवाज उठवायचा की नाही?

प्रश्न : रिया चक्रवर्ती ही महिला नाही का? भाजपचे समर्थक तिच्यावर कशा पद्धतीने टीका करतात? त्याचे समर्थन तुम्ही कसे करता?

उत्तर : कोणत्याही महिलेचा मानसिक छळ होणे चुकीचेच आहे. रिया ही काही अबला नाही. तिची बाजू मांडण्यासाठी तिच्याकडे वकिलांची मोठी फौज आहे. तिच्याबद्दल बोलणारे हे भाजपचे समर्थक असणे मानणे चुकीचे आहे. कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो सोशल स्टेटसवर ठेवला म्हणजे तो भाजपचा सदस्य आहे, असे मानणे चुकीचे आहे. माझ्या कामाचा फोकस ठरलेला आहे. सामान्य, वंचित महिलांसाठी मी लढते आहे. माझ्या मदतीची रियाला गरज नाही. 

प्रश्न : अभिनेत्री कंगना राणावत ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरत होती. तेव्हा तुम्ही का गप्प होता?

उत्तर : कंगना जी बोलली तिचे भाजपने कोठेही समर्थन केलेले नाही. कोणीही असो पदाचा मान राखला पाहिजे. एकेरी उल्लेख करणे चुकीचे आहे. पण भाजप विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत जी भाषा वापरली जाते तेही चुकीचे आहे.

प्रश्न : महिला नेत्यांना सोशल मिडियावर फार गलिच्छ भाषेत ट्रोलिंग केले जाते. तुम्ही त्यावर कशा पद्धतीने व्यक्त होता?

उत्तर : ट्रोलिंगच्या पलीकडे आम्ही गेलो आहोत. त्यासाठी काही लोकांकडून टोळ्या बनवण्यात आल्या आहेत. माझे पती, मुलगा यांच्याबाबतही खालच्या भाषेत ट्रोलिंग होत. आत्ता काही राजकीय महिलांनीही ट्रोलिंगसाठी वेगळे ग्रुप तयार केले आहेत. यावर सायबर क्राईमची  कोणतीही कारवाई होत नाही, हे दुर्दैव आहे

प्रश्न : तुम्ही महिलांच्या अपमानाविषयी नेहमी बोलता पण भाजपचे नेते राम कदम यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तुम्ही भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना काही सल्ला दिला की नाही? 

उत्तर : राम कदम यांनी जे व्यक्तव महिलांविषयी केले त्याची शिक्षा ते आजपर्यंत भोगत आहेत. त्यांच्याविरोधात केस मीच टाकली होती. नेत्यांच्या तोंडून काही वेळा अशी विधाने जातात. मात्र याचा अर्थ ती व्यक्ती वाईट असते, मानणे चुकीचे आहे. कदम हे त्यांच्या मतदारसंघात करत असलेल्या कामांवरून आपल्याला लक्षात येते.

प्रश्न : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या सर्वाधिक ट्रोल होतात. त्याचा भाजपला राजकीय फटका बसतो, असे वाटत नाही का? त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?

उत्तर : अमृता फडणवीस या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या आहेत. त्यांची स्वतःची मते ठरलेली आहे. त्यांना मी कोण सल्ला देणारी? बरे त्यांच्या मतांचा भाजपला फटका बसतो हे कशावरून? भाजपनेही तशी कधी तक्रार केलेली नाही.

प्रश्न : पुण्यात आल्यानंतर तुमच्या जुन्या मैत्रीण रुपाली चाकणकर यांना भेटता की नाही की राजकीय वादामुळे सध्या दुरावा आहे? 

उत्तर : त्या माझ्यावर विनाकारण टीका करतात. त्यामुळे त्यांना तसे उत्तर दिले होते. आमच्यात वैयक्तिक भांडण काही नाही.  राष्ट्रवादी काॅंग्रेस सोडून मी जेव्हा भाजपमध्ये जाणार होते तेव्हा मी रुपाली चाकणकरांना फोन करून राष्ट्रवादीत माझी जागा तुला मिळू शकेल, असे सुचविले होते. पुण्याची महिला राष्ट्रवादीची जबाबदारी स्थानिक विरोध असताना मीच त्यांना दिली होती. मात्र त्याच माझ्यावर टीका करत असतात. मात्र ती मी फार गंभीरतेने घेत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com