रामटेकमधून मुकुल वासनिक यांचेच नाव निश्‍चित होणे शक्‍य...

 रामटेकमधून मुकुल वासनिक यांचेच नाव निश्‍चित होणे शक्‍य...

नागपूर : रामटेक मतदारसंघातून कॉंग्रेसची उमेदवारी माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांना मिळण्याची आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. माजी मंत्री नितीन राऊत यांनी या मतदारसंघातून लढण्याची तयारी दाखविली तरी ते या मतदारसंघासाठी फार इच्छुक नाहीत. 

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक या मतदारसंघात मुकुल वासनिक व नितीन राऊत यांनी दावेदारी दाखल केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मुकुल वासनिक सेनेचे कृपाल तुमाने यांच्याकडून पराभूत झाले होते. वासनिक यांच्या दरबारी राजकारणामुळे ते रामटेककडे फारसे फिरकले नव्हते. वासनिक फारसे उत्सुक नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर नितीन राऊत यांनी या मतदारसंघात तयारी सुरू केली होती. 

प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व राऊत यांचे पुत्र कुणाल यांनी या मतदारसंघात जनसंपर्कही सुरू केला होता. नितीन राऊत यांच्या चांगल्या प्रतिमेमुळे या मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीचे स्वागतही करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे एकमेव आमदार सुनील केदार यांनीही राऊत यांच्या पारड्यात वजन टाकले. मात्र दिल्लीतील वजन लक्षात घेऊन रामटेकसाठी मुकुल वासनिक यांचेच नाव फायनल होण्याची शक्‍यता अधिक आहे. 

गेल्या चार वर्षांपासून मुकुल वासनिक रामटेकपासून अलिप्त होते. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी जनसंपर्क सुरू केला आहे. यामुळे वासनिक पुन्हा रामटेकसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले होते. प्रदेश कॉंग्रेस समितीच्या निवड समितीनेही वासनिक यांच्या पारड्यात वजन टाकले आहे. नितीन राऊत यांचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी फारसे सख्य नाही. ही बाब सुद्धा वासनिक यांच्या पथ्यावर पडली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com