पत्नीच्या उमेदवारीसाठी खासदार उन्मेश पाटीलांची प्रतिष्ठा पणाला !

..
Unmesh-&-sampada-patil.
Unmesh-&-sampada-patil.

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे जळगाव मतदार संघातील खासदार उन्मेश पाटील हे पत्नी सौ.संपदा पाटील यांना चाळीसगाव विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मिळावी यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे . आपण मतदार संघात केलेले कार्य पाहता पक्षाने पत्नीस उमेदवारी द्यावी असा त्यांचा आग्रह आहे. 

जळगाव लोकसभा मतदार संघातील चाळीसगाव येथील भाजपचे आमदार उन्मेश पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा देवून लोकसभा निवडणूका लढविली. त्यात त्यांना यशही मिळाले आणि ते खासदार झाले. आता चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे. या मतदार संघात पत्नी सौ.संपदा पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे.

मतदार संघात आपले कार्य असून संपर्कही असल्याचा त्यांचा दावा आहे. उन्मेश पाटील हे जलसंपदामंत्री महाजन यांच्या विश्‍वासातील आहे. लोकसभा निवडणूकीत भाजपतर्फे आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. ऐन वेळी पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द करून आमदार उन्मेश पाटील यांना दिली होती.

लोकसभा निवडणूक पक्षाच्या आदेशाने आपण लढविली त्यामुळे विधानसभा निवडणूकीत पक्षाने पत्नी सौ.संपदा पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह पक्षश्रेष्ठीकडे त्यांनी गळ घातली आहे.

याच मतदार संघातून खासदार उन्मेश पाटील यांचे मित्र व मंगेश चव्हाण यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. या शिवाय इतर सतरा जणांनी पक्षाचे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र सौ.संपदा पाटील यांनी प्रचारही सुरू केला आहे. तर दुसरीकडे मंगेश चव्हाण यांनीही प्रचार सुरू केला. त्यांनी चाळीसगावात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

गेल्या काही दिवसापासून चाळीसगावकरांना नामवंत कलाकारांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाची मेजवानी खासदार उन्मेश पाटील व मंगेश चव्हाण यांच्यातर्फे स्वतंत्रपणे देण्यात आली आहे. खासदार उन्मेश पाटील हे पत्नी संपदा पाटील यांच्या उमेदवारीसाठी पूर्ण प्रयत्नशील आहेत.

आपल्या कार्याच्या बळावर पत्नीला उमेदवारी मिळावीच अशी त्यांची मागणी असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदारानीच पत्नीच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावल्याने या मतदार संघात भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याकडेच आता जनतेचेही लक्ष लागले आहे.

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com