MP Sujay Vikhe Solved Lake Di silting Issue in Nagar District | Sarkarnama

जे कर्डिलेंना जमले नाही, ते सुजय विखेंनी करून दाखविले

मुरलीधर कराळे
बुधवार, 25 मार्च 2020

लष्कराच्या ताब्यात असलेल्या कापुरवाडी (ता. नगर) येथील तलावाचा गाळ काढण्यास खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मान्यता मिळाली आहे. हा तलाव माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे गाव असलेल्या बुऱ्हाणनगरलगत आहे

नगर : लष्कराच्या ताब्यात असलेल्या कापुरवाडी (ता. नगर) येथील तलावाचा गाळ काढण्यास खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मान्यता मिळाली आहे. हा तलाव माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे गाव असलेल्या बुऱ्हाणनगरलगत आहे. गाळ काढल्याचा सर्वात जास्त फायदा या गावाला होईल. कर्डिले यांनीही यापूर्वी अनेकदा याप्रश्नी प्रयत्न केले. मात्र संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित हा विषय असल्याने त्यांना यश आले नव्हते.

नगर तालुक्यातील कापूरवाडी बुऱ्हाणनगर, भिंगार, नागरदेवळे , सारसनगर व परिसरातील बारा गावांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा कापूरवाडी तलाव गेल्या अनेक वर्षापासून  लष्कराच्या ताब्यात होता. नगर तालुका व परिसराच्या पिण्याच्या व जलसंधारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या तलावातील गाळ काढण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून  स्थानिक लष्करी प्रशासनाकडे  प्रलंबित होती. स्वातंत्र्योत्तर काळापासून कापूरवाडी तलाव हा लष्कराच्या ताब्यात आहे. या तलावातून पूर्वी भुयारी पाइपलाइनद्वारे लष्कराच्या  घाटापर्यंत पाणी दिले जात होते. 

कापूरवाडी, नागरदेवळे, बुऱ्हाणनगर, भिंगार आणि इतर बारा गावांसाठी पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची सोय या तलावातून पूर्वी होती.  स्वातंत्र्यानंतर  लष्कराच्या अखत्यारीत हा तलाव आला आला. यापूर्वी देखील लोकप्रतिनिधींनी व जनतेने वेगळे निवेदने देऊनसुद्धा रक्षा मंत्रालयाने याबाबत कधीही परवानगी दिलेली नव्हती. मात्र खासदार डॉ. विखे पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयाला या संदर्भात विस्तृत सादरीकरण केल्यानंतर रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी लष्करी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. कापूरवाडी तलावातील गाळ  काढण्यास अखेर मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार विखे पाटील यांनी दिली.

लाॅक डाऊन संपल्यानंतर बैठक

या संदर्भात नुकताच पत्रव्यवहार झाला असून, परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या प्रश्न अखेर  मार्गी लागल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसाच्या लाॅकडाऊन नंतर या संदर्भात संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे व लष्कर प्रशासनातील वरिष्ठांची बैठक घेऊन गाळ काढण्याबाबत आवश्यक तो लोकसहभाग व इतर पूरक बाबींच्या पूर्ततेसाठी लवकरच बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकत्रित सहभाग वाढविणार

शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या तलावातील गाळ काढल्यानंतर परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. साठवण तलावाची क्षमता वाढवून भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न देखील निकाली निघणार आहे. गाळ काढण्यासाठी स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग  आणि प्रशासन या सगळ्यांच्या एकत्रित सहभागाची सहभागासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख