MP Srirang Barane's working pattern | Sarkarnama

पॅटर्न पुढाऱ्यांचा : खासदार श्रीरंग बारणेंच्या साथीला दोन संपर्क कार्यालये, चार पीए! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मे 2017

गेली चार टर्म पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक होतो. 2014 मध्ये मावळमधून खासदार म्हणूनही निवडून आलो. त्यामुळे पूर्वी जनसंपर्कासाठी एकच सहाय्यक (पीए) होता. ती संख्या आता चार करावी लागली आहे. पालिका आणि राज्य सरकारशी संबंधित जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र पीए आहेत. दिल्लीतील कामे आणि खासदार निधीचा वापर यासाठी वेगळे पीए आहेत. परिणामी जनसंपर्क करणे सोईचे झाले आहे. त्यामुळे समन्वयही राहत आहे. 
- श्रीरंग बारणे, खासदार मावळ मतदारसंघ 

घाटाखाली आणि घाटावर असा मावळ लोकसभा मतदारसंघ विभागला आहे. त्यामुळे घाटावर जनसंपर्कासाठी थेरगाव येथील निवासस्थानाजवळ आणि घाटाखाली पनवेल येथे संपर्क कार्यालये सुरू केली आहेत. दिल्लीत बैठक वा संसदीय काम नसेल, तर थेरगाव येथे नक्की उपलब्ध असतो. 

दर शनिवारी आणि रविवारी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत जातीने मी नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तेथे दोन पीए आहेत. ते पालिका आणि राज्य सरकारशी निगडित जनतेची कामे पाहतात. जनतेच्या गाऱ्हाण्यांवर त्या त्या विभागाला ते लेखी पत्रे देतात. तर, पनवेल येथील कार्यालयात दर मंगळवारी दिवसभर थांबून तेथील स्थानिकांशी संपर्क साधतो. उरण आणि कर्जत तालुक्‍यांत शुक्रवारी आणि शनिवारी जाहीर कार्यक्रम घेतो. 

दिल्लीतील कामकाज तेथील पीए पाहतो. खासदार निधीतून करावयाच्या कामाची जबाबदारी स्वतंत्र सहाय्यक पाहतो. ठेकेदाराकडून चहाचीसुद्धा माझी अपेक्षा नसल्याने कामाचा दर्जा व त्यावरील सरकारी अभिप्राय पाहिल्यानंतरच त्यांचे पैसे अदा करण्याची माझी कामाची पद्धत आहे. दोन्ही कार्यालयातील 99 टक्के पत्रव्यवहार स्वतः चेक करून त्यावर पुढील कार्यवाही करतो. अशाच पद्धतीने मोबाईलवरील तक्रारी व समस्यांचेही निरसन करतो. दोन संपर्क कार्यालयांच्या जोडीने खासदार आपल्या दारी हा उपक्रमही मी मतदारसंघात सर्वसामान्यांसाठी सुरू केला आहे. त्यात मीच ठराविक भागात ठराविक दिवशी जाऊन तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतो. त्यातून कार्यालयात येण्यासाठी वेळ नसणाऱ्या मोठ्या समूहाचे नेमके प्रश्‍न कळतात. त्यातून तहसीलदार, जिल्हाधिकारी आदी कार्यालयातील मतदारांचे प्रश्‍न समजून ते मार्गी लावता येतात. 

घाटाखाली तसेच घाटावरील वैयक्तिक तक्रारी सर्वाधिक आहेत. बदलीची मागणी आवश्‍यक वाटत असेल, तरच संबंधित मंत्र्यांना पत्र देतो. मात्र, बदल्यांत अधिक इंटरेस्ट नाही. त्यामुळे त्याबाबत आग्रही नसतो. ऍडमिशन आणि सार्वजनिक कामेही घेऊन येतात. काहीजण कामाऐवजी सूचना करतात. त्यांचीही दखल घेतो. ग्रामीण भागात पाणवठा, शौचालय, आणि अंतर्गत रस्त्यांचा मोठा प्रश्‍न असल्याने खासदार निधीतून या कामांना प्राधान्य देतो. मतदारसंघाची मोठी व्याप्ती आणि तेथील अनेक कामे आणि त्यातुलनेत मिळणारा अपुरा खासदार निधी यामुळे कामाचे नियोजन करावे लागते. अत्यावश्‍यक कामांना प्राधान्य देतो. मोबाईलवरील 90 टक्के फोन घेतो. कार्यक्रम व तत्सम कामामुळे न घेतलेल्या फोनला नंतर रिप्लाय देतो. वीस वर्षे नगरसेवक म्हणून असलेला दांडगा जनसंपर्क खासदार म्हणून काम करताना चांगलाच कामी आला आहे. 

(शब्दांकन : उत्तम कुटे)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख