'शाळेची अन् देवळाची घंटा एकच, तरीही राज्यपाल झालो!' श्रीनिवास पाटीलांनी उलगडले बालपणातील दिवस

राजकारणापलीकडे जाऊनएक कुशल प्रशासक, रांगडेपणाला शोभणारा रुबाबदारपणा, फर्डे वक्तेपण हे खासदार श्रीनिवास पाटील यांच्याव्यक्तिमत्वाचे पैलू.नुकतीच त्यांनी वाई तालुक्यातील भिलारवाडी येथे आयोजित विद्यार्थ्यांच्या बालआनंद मेळाव्यास हजेरी लावली. त्यात त्यांनीआपला शिक्षणप्रवास उलगडला
MP Shriniwas Patil unfolded his Schood Days
MP Shriniwas Patil unfolded his Schood Days

सातारा : "आमची जिल्हा परिषदेची शाळा भरायची मारुतीच्या देवळात... देवळाची अन् शाळेची घंटा एकच ! शाळेचे शिक्षक मात्र एकापेक्षा एक करारी, मेहनती अन् म्हणूनच एका जिल्हा परिषद शाळेत शिकलेला, खेड्यातल्या विद्यार्थी जिल्हाधिकारी, आयुक्त, तीन वेळा खासदार अन् अगदी राज्यपालसुद्धा झाला!'' हे अनुभवकथन आहे खासदार श्रीनिवास पाटील यांचे. राजकारणापलीकडे जाऊन एक कुशल प्रशासक, रांगडेपणाला शोभणारा रुबाबदारपणा, फर्डे वक्तेपण हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू. 

नुकतीच त्यांनी वाई तालुक्यातील भिलारवाडी येथे आयोजित विद्यार्थ्यांच्या बालआनंद मेळाव्यास हजेरी लावली. आपला शिक्षण प्रवास उलगडताना श्रीनिवास पाटील  म्हणाले, "मला अंकगणितात शंभर पैकी 99 गुण आहेत. सातवीला पहिला, मॅट्रिकला सुद्धा पहिला अन् विद्यापीठात गोल्ड मेडॅलिस्ट! प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी जर मनावर घेतलं, तर खेड्यातल्या विद्यार्थी राज्यपालसुद्धा होऊ शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे;  पण यातला 'मी' काढून टाका." 

शिक्षकांना कानमंत्र द्यायलाही ते विसरले नाहीत. "शिक्षकाने पोटच्या पोरांसारखे विद्यार्थ्यांवर प्रेम करावे, आकार द्यावा, घडवावे. शाळेमध्ये संगीत शिक्षण, नृत्य, गायन शिक्षण, इंग्रजी,उर्दू, हिंदी असे बहुभाषिक विद्यार्थी घडवा. आसपासच्या शाळा एकमेकांना जोडा, सेतू बांधा अन् एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवा, त्यांना पोवाडा शिकवा, जोगवा शिकवा, गोंधळ शिकवा, साने गुरुजी सांगा, तानाजी- बाजीच्या शौर्याच्या कथा सांगा, स्पर्धा परीक्षासुद्धा शिकवा. मग कसा जिल्हा परिषद शाळेचा पट वाढणार नाही तेच बघूया" असा सल्ला त्यांनी दिला.

बालआनंद मेळाव्यातील ओसंडून वाहणारा उत्साह, जोशपूर्ण वातावरण, शाहीर, गोंधळी, लावणी, नृत्य, विविध  वेशभूषेतील बालकलाकार पाहून ते विद्यार्थ्यांत मनसोक्त रमले. नेहमीप्रमाणे ग्रामीण सातारी ढंगातील मराठी भाषेचा गोडवा कथन करत, शाब्दिक कोट्या, गमतीजमती, अनुभव, गप्पागोष्टी सांगत शिक्षकांना अन् ग्रामस्थांना त्यांनी हळुवारपणे आत्मचिंतन करायला लावले. त्यांची उपस्थिती अन् आगळ्या हृदयसंवादाने सारेच अक्षरशः भारावून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com