`भाऊबीजेच्या ओवाळणीवरून आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीला देव बुद्धी देवो`

`भाऊबीजेच्या ओवाळणीवरून आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीला देव बुद्धी देवो`

कोथरूडमधील साड्यावाटपावरून राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांत शाब्दिक लढाई जुंपली आहे.

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी कोथरूडमध्ये साड्यावाटप केल्याबद्दल त्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी टीका केली आहे. आंदोलनासाठी विषय नसल्याने भाऊबीजेसारख्या विषयावरून पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीला देव सद्बुद्धी देवो, असा टोला त्यांनी लगावला . 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुडचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीत भाऊबीज निमित्त मतदारसंघातील महिलांना साडी भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेससह, मनसे, आप यांनी या विरोधात आंदोलन केले. 

याबाबत प्रतिक्रिया देताना काकडे यांनी पुण्यातील नेत्यांनी याप्रकरणी अतिशय हीन पातळीवर जाऊन राजकारण केल्याचा आरोप केला.  हिंदू संस्कृतीत भाऊबीज निमित्त भाऊ बहिणीला साडी भेट देतो आणि चंद्रकांत पाटील यांनी भाऊ समजूनच कोथरुड मतदार संघातील माता-भगिनींना साडी भेट दिली. या साड्या वाटपाचा आणि निवडणुकीचा काहीच संबंध नाही. मतदान झाले, निकालही आला. त्यानंतर मतदारसंघातील भगिनींना भेट देण्यात चुकीचे काय, असा सवाल त्यांनी केला. 

पुणे हे शहर काही राष्ट्रवादीला आंदण दिलेले नाही. कोल्हापूरचा नेता पुण्यात येऊन येथील भगिनींची काळजी घेतो आहे, हे राष्ट्रवादीला रूचलेले नाही. त्यामुळे अजित पवार व राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बालिश वक्तव्ये करत आहेत. त्यांनी आंदोलन का केले हेच समजत नाही. देशात किंवा जगात अशाप्रकारे आंदोलन झाले नसेल. यातून त्यांची परिपक्वता लक्षात येते. देव त्यांना ही परिपक्वता लवकर देवो, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले. 

चंद्रकांतदा पाटील हे बारामती लोकसभा मतदार संघ, पश्चिम महाराष्ट्र आणि एकूणच राजकारणात खूप सक्रिय होते व आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून चंद्रकांत दादा पाटील यांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन लक्ष्य करत असल्याचा काकडे यांनी निषेध केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com