MP Omprakash RajeNimbalkar Fitness Funda | Sarkarnama

दररोज पाच किमी रनिंग, 137 सूर्यनमस्कार हेच फिटनेसचे रहस्य :ओमप्रकाश राजेनिंबाळकर

तानाजी जाधवर
शनिवार, 25 जानेवारी 2020

राजकारणाचा व्याप सांभाळुन स्वतःच्या फिटनेससाठी वेळ काढणे सहसा राजकीय लोकांना जमत नाही. पण खासदार ओमराजे मात्र काहीही झाले तर दिवसातील एक तास तरी व्यायामासाठी देतातच

उस्मानाबाद : राजकीय मैदानात विरोधकांशी दोन हात करणारी मंडळी त्यांच्या आरोग्याच्या बाबतीतसुध्दा दक्ष असते. त्याचे चांगले उदाहरण म्हणुन उस्मानाबादचे तरुण खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणाचा व्याप सांभाळुन स्वतःच्या फिटनेससाठी वेळ काढणे सहसा राजकीय लोकांना जमत नाही. पण खासदार ओमराजे मात्र काहीही झाले तर दिवसातील एक तास तरी व्यायामासाठी देतातच. 

याबाबत ओमप्रकाश राजे निंबाळकर सांगतात.....
दररोज एक ते सव्वा तास व्यायामासाठी मी काढतोच. त्यातही सकाळीच व्यायामला माझे जास्त प्राधान्य असते, पण अनेकदा रात्री उशीर झाल्यानंतर सकाळी उठायला जमत नाही, तेव्हा मग रात्री हमखास व्यायामासाठी एक तासभर मी वेळ काढतो. बऱ्याचदा मी पहाटेच प्रवासातुन घरी येतो, तेव्हा तर व्यायाम करुनच मी आराम करतो. व्यायामासाठी कोणतीही वेळ असली तरी चालते पण त्यामध्ये सातत्य राखणे महत्वाचे आहे. 

धावणे, सुर्यनमस्कार व जीमला प्राधान्य

माझ्या गोवर्धन वाडीच्या घरात जीम असुन पहिल्यांदा पाच किलोमीटर धावणे व त्यानंतर सुर्यनमस्कार करुन घरातील जीममध्ये काहीवेळ कसरत केल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही. पुण्यात, मुंबईत व दिल्लीत सुध्दा याच प्रकारे माझ्या व्यायामाचे शेड्युल असते. पाच किलोमीटर धावण्यासाठी पंचवीस मिनिटे तसेच 45 मिनिटे सुर्यनमस्कार करतो. एवढ्या वेळात माझे 137 सुर्यनमस्कार होतात. धावण्याला अडचण असेल तर मग सुर्यनमस्कार याला जास्त वेळ देतो. धावण्यासाठी लागणारा ड्रेसकोड व बुट कायम माझ्या गाडीत असतो. तेव्हा कुठेही वेळ मिळेल तिथे मी व्यायाम करतो.   

दिवसातून दोनदा जेवण

दिवसातुन दोनवेळाच जेवण करतो, इतर वेळी अधिकाधिक प्रोटीन युक्त आहार कसा मिळेल याचा प्रयत्न करतो.चहा मी पितच नाही, फार आग्रह झाला तर कधीतरी अपवादात्मकच.सकाळी घरातुन बाहेर पडायच्या अगोदर जेवण करुनच जातो.संध्याकाळी मात्र जेवण माझ लवकर म्हणजे सातच्या अगोदर असते. व्यायामा नंतर आहारात प्रोटीनशेक, सोयाबीन याचा समावेश असतो. 

मॅरेथॉन मध्ये सहभाग

आतापर्यंत मी तीन हाफ मॅरेथॉन पुर्ण केल्या आहेत, यामध्ये उस्मानाबाद येथील दोन तर सातारा येथील एक स्पर्धा पूर्ण केली आहे. सातारातील हाफ मॅरेथॉन तुलनेने कठिण होती, डोंगर रस्त्यावरुन धावण्याची कसरत फार आव्हानात्मक वाटली.  गेल्या दहा ते बारा वर्षापासुन माझ्या व्यायामाचा दिनक्रम ठरलेला आहे. व्यायामाला पर्याय नाही.  साधारण निवडणुकीच्या काळात मात्र ठरवुनही व्यायामाकडे लक्ष देता येत नाही. काम करण्यासाठी उर्जा व उत्साहाची फार गरज असते, येणाऱ्या प्रत्येक नागरीकाला वेळ देणे यासाठी तो आपल्या कामाला येतो. राजकीय पुढाऱ्याला थकुन चालत नाही .

आजकाल जग एवढ जवळ आले आहे की, सामान्य नागरीक सुध्दा एका सेंकदात आपल्याशी संवाद साधु शकतो त्यांच्याशी बोलतानाही आपणही तेवढाच उत्साह दाखविणे गरजेचे असते. यासाठी व्यायामाशिवाय गत्यंतर नाही....
...असेही ते शेवटी म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख