दोन तास अठरा मिनिटांत एकवीस किलोमीटर धावले खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर - MP Omprakash RajeNimbalkar and MLA Kailash Patil Completed Half Marathon | Politics Marathi News - Sarkarnama

दोन तास अठरा मिनिटांत एकवीस किलोमीटर धावले खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

तानाजी जाधवर
रविवार, 15 डिसेंबर 2019

एरवी एखाद्या धावण्याच्या स्पर्धेला राजकीय व्यक्तीला उद्धाटनासाठी बोलावले तर स्पर्धकांना हिरवा झेंडा दाखवणे एवढेच काय ते काम पार पाडले जाते. राजेनिंबाळकर यांनी मात्र उस्मानाबादेत आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला नुसता हिरवा झेंडाच दाखवला नाही, तर स्वत:ही सहभागी झाले आणि एकवीस किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील हे देखील या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते

उस्मानाबाद : राजकारणात विरोधकांशी दोन हात करतांना निरोगी आणि धष्टपुष्ट शरीर तर हवेच. पण ते मिळवण्यासाठी करावी लागणारी तयारी आणि मेहनत घेणे फारच कमी राजकारण्यांना जमते. शिवसेनेचे खासदार ओप्रकाश राजेनिंबाळकर हे मात्र याला अपवाद ठरतात. शहरातील एका मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी एकवीस किलोमीटर धावत आपल्या फिटनेसचा परिचय दिला.

एरवी एखाद्या धावण्याच्या स्पर्धेला राजकीय व्यक्तीला उद्धाटनासाठी बोलावले तर स्पर्धकांना हिरवा झेंडा दाखवणे एवढेच काय ते काम पार पाडले जाते. राजेनिंबाळकर यांनी मात्र उस्मानाबादेत आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला नुसता हिरवा झेंडाच दाखवला नाही, तर स्वत:ही सहभागी झाले आणि एकवीस किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील हे देखील या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते, ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत राजेनिंबाळकर यांच्या सोबत धावले.

मॅरेथॉनाला सकाळी तुळजाभवानी स्टेडियमपासून सुरूवात झाली तर 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या हातलादेवी मंदिरापुढील घाटंग्री गावापर्यंत स्पर्धकांना धावायचे होते. स्पर्धेला सुरूवात करून दिल्यानंतर खासदार राजेनिंबाळकर देखील सहभागी झाले आणि एकवीस किलोमीटरचे अंतर पुर्ण करूनच थांबले. दोन तास अठरा मिनिटांत त्यांनी हे अंतर पार केले.

राजेनिंबाळकर आणि पाटील या खासदार आमदार जोडीचा उत्साह पाहून स्पर्धक आणि उपस्थित सर्वचजण आश्‍चर्यचकित झाले होते. स्पर्धा संपल्यानंतर या दोघांसोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या दोघांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे देखील वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या उत्साहात राजेनिंबाळकर-पाटील यांनी विजेत्यांसोबत फोटो काढत त्यांचे अभिनंदन केले. नियमित धावण्याची सवय आणि त्यात ठेवलेल्या सातत्यामुळे आपण सलग एकवीस किलोमीटर धावू शकलो. मॅरेथॉन सारख्या स्पर्धांमधून आपल्याला उर्जा मिळते असे राजेनिंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख