MP Heena Gavit & Maratha agitators battle is intensifying | Sarkarnama

  डॉ. हीना गावित आणि मराठा आंदोलकातील वाद वाढत चालला 

निखिल सूर्यवंशी : सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

मराठा क्रांती मोर्चाच्या 22 पैकी 18 आंदोलकांना मंगळवारी सायंकाळी साडेपाचनंतर जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. या निर्णयाविरुद्ध खासदार गावित या आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहेत.

धुळे :  लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघातील भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्यावरील हल्ला प्रकरणी जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या 22 पैकी 18 आंदोलकांना मंगळवारी सायंकाळी साडेपाचनंतर जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. या निर्णयाविरुद्ध खासदार गावित या आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहेत. त्यामुळे आंदोलक विरुद्ध खासदार हा वाद जाणार   असल्याचे चिन्ह आहे. 

आरक्षणप्रश्‍नी सकल मराठा समाज, जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे गेल्या 25 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यात 16 व्या दिवशी पाच ऑगस्टला रविवारी दुपारी नियोजन मंडळाची बैठक होती. खासदार गावित कारने बाहेर पडल्या. त्यावेळी मराठा आंदोलक व पोलिसांच्या रेटारेटीत प्रवेशव्दार उघडल्याने संबंधित थेट कारवर चढल्याने कारचे  नुकसान झाले. या प्रकरणी खासदार गावित यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली. संशयित चौघा आंदोलकांना अटक झाली. दुसऱ्या दिवशी लोकसभेत खासदार गावित यांनी आवाज उठविल्यावर 22 आंदोलकांवर 'ऍट्रॉसिटी'चाही गुन्हा दाखल झाला. 

परस्परांविरोधात वकिलांची फौज
अटकेतील 22 आंदोलकांनी जामिनासाठी अर्ज केला. आंदोलकांतर्फे 150, तर डॉ. गावित यांच्यातर्फे 45 वकिलांची फौज उभी राहिली. कारमध्ये खासदार गावित असल्याचे माहीत असूनही आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा युक्तिवाद ऍड. मधुकर भिसे व इतरांनी केला. प्रत्युत्तरात खासदार गावित यांच्या कारची काच 'डार्क' होती. त्यामुळे कुणी दिसण्याचा प्रश्‍नच नव्हता.

आंदोलकांकडे हत्यारे नव्हती. त्यांचा खासदारांना जीवे ठार मारण्याचा कुठलाही हेतू नव्हता. त्यासह 'ऍट्रॉसिटी'बाबत आंदोलकांनी गुन्हा केल्याचे फिर्यादीत कुठेही नमूद नाही. चंद्रकांत खैरे यांच्याप्रमाणे खासदार गावित या मनाचा मोठेपणा दर्शवत खोटा गुन्हा दाखल करणे टाळू शकत होत्या, असा युक्तिवाद ऍड. दिलीप पाटील, ऍड. श्‍यामकांत पाटील, ऍड. एम. एस. पाटील यांनी केला. 

समाजात चुकीचा संदेश 
चौघा आंदोलकांच्या नामंजूर जामिनासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात दाद मागू, असे ऍड. पाटील म्हणाले. जामीन मंजूर झालेले 18 व अटकेतील इतर चौघांना जामीन मिळू नये म्हणून खंडपीठात दाद मागितली जाईल, असे नंदुरबारचे ऍड. वसंत वळवी यांनी सांगितले. या प्रकरणी एकीकडून 150, तर दुसरीकडून 45 वकिलांची फौज उभी असल्याचे चित्र समाजासमोर जाणे योग्य नाही. त्यातून चुकीचा संदेश जात आहे. शक्तीप्रदर्शनातून नव्हे तर युक्तिवादातून कायदेशीर लढाई केली जाते. भविष्यात तसे होऊ नये, अशी अपेक्षा जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी युक्तिवादात मांडली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख