MP Forgot his Constituency | Sarkarnama

अन् खासदारांनाच पडला त्यांच्या मतदारसंघाचा विसर  

मुशीरखान कोटकर 
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

''मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघ गेल्या वीस वर्षापासून मागासलेला असल्याने बोचरी टीका करण्यासाठी या मतदारसंघाचे नाव घेतले जाते," अशा प्रकारचे वक्तव्य करीत विरोधकावर कुरघोडी करण्याच्या नादात खासदार प्रतापराव जाधव यांना बुलढाणा जिल्ह्यात मातृतीर्थ मतदारसंघाचा समावेश होतो, याचा विसर पडला आहे.              

देऊळगाव राजा : ''मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघ गेल्या वीस वर्षापासून मागासलेला असल्याने बोचरी टीका करण्यासाठी या मतदारसंघाचे नाव घेतले जाते," अशा प्रकारचे वक्तव्य करीत विरोधकावर कुरघोडी करण्याच्या नादात खासदार प्रतापराव जाधव यांना बुलढाणा जिल्ह्यात मातृतीर्थ मतदारसंघाचा समावेश होतो, याचा विसर पडला आहे.                                          

आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी शहरातून जाणाऱ्या रस्ता रुंदीकरण साठी 14 कोटी रुपये चा निधी दिला होता या मार्गाच्या डांबरीकरणाचा शुभारंभ खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. जालना मार्गावरील वळण रस्त्यावर शहरातून जाणाऱ्या सहा किलोमीटर डांबरीकरण मार्गाचा शुभारंभ आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. तदनंतर आयोजित कार्यक्रमात खासदार जाधव बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनीताताई शिंदे तर उपनगराध्यक्ष प्रवीण गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आमदार डॉ. खेडेकर, नगराध्यक्ष श्रीमती शिंदे यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहिले. आपल्या भाषणात त्यांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव न घेता टीका करण्यास सुरुवात केली. दरम्यान 14 कोटी किमतीचा हा रस्ता दहा टक्के बिलोव् गेला असला तरी रस्त्याचे काम दर्जेदार होईल अशी अपेक्षा त्यांनी कंत्राटदारांकडून व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले की मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघ वीस वर्षापासून मागासलेला आहे. ही कामे गेल्या वीस वर्षात झाली नाहीत. युती सरकारने गेल्या साडेचार वर्षात अशी अनेक कामे पूर्णत्वास नेली. 

हा मतदारसंघ केवढा बकाल आहे की जिल्ह्यातील इतर तालुक्यात एखाद्या कामचुकार अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला समज द्यायची असेल तर 'पाठवायचं का तुला मी सिंदखेड राजा व देऊळगाव राजा भागात,' असे कुत्सितपणे विचारले जाते. त्यांच्या या टीकेनंतर उपस्थित शिवसैनिकांमध्ये हास्य पसरले. प्रतापराव जाधव गेल्या दहा वर्षापासून जिल्ह्याचे खासदार आहेत. मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघ त्यांच्या लोकसभा क्षेत्रात आहे. मतदारसंघावर बोचरी टीका  करण्याच्या मोहात ही दोन्ही तालुके त्यांच्या लोकसभा कार्यक्षेत्रात आहेत. या गोष्टीचा त्यांना विसर पडला. 

मतदार संघाच्या मागासलेपणा व बकालपणास गत वीस वर्षापासून आमदार असलेल्या त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांत बरोबर गेली दहा वर्षे जिल्ह्याचे खासदार म्हणून ते ही तेवढेच जबाबदार आहेत ही बाब नाकारता येणार नाही. ज्याअर्थी सिंदखेडराजा  मतदार संघाच्या मागासलेपणास गेली पंचवीस वर्षापासून विधानसभा सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत; त्याच बरोबर मागील दोन पंचवार्षिक लोकसभा खासदार म्हणून प्रतिनिधित्व करीत असताना आपण स्वतः जबाबदार आहोत, याचा लोकप्रतिनिधी या नात्याने खासदार प्रतापराव जाधव यांना ही एक प्रकारे विसर पडल्याची खमंग चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख