mp dhairysheel mane write letter to housing comitee | Sarkarnama

'29 मीना बाग' हाच बंगला हवाय हातकणंगलेच्या खासदारांना!

निवास चौगले 
मंगळवार, 11 जून 2019

17 व्या लोकसभेत तब्बल 300 खासदार हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. याचा अर्थ तेवढ्याच माजी खासदारांना घरे सोडावी लागणार आहेत.

कोल्हापूर : दिल्लीतील ज्या बंगल्यात सलग 25 वर्षे आजोबांचे वास्तव्य होते, तोच बंगला हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे नूतन खासदार धैर्यशील माने यांना हवा आहे. '29 मीना बाग' असे या बंगल्याचे नांव असून तो आपल्याला मिळावा अशी मागणी श्री. माने यांनी निवासस्थान वाटप समितीकडे केली आहे.

श्री. माने यांचे आजोबा कै. बाळासाहेब उर्फ राजाराम माने हे सलग 25 वर्षे खासदार होते. 1977 साली आताच्या हातकणंगले व त्यावेळच्या इचलकरंजी लोकसभा मतदार संघातून कै. माने पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर 1980, 1984, 1989 आणि 1991 साली झालेल्या निवडणुकीत ते कॉंग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. 1996 साली या मतदार संघातून माजी खासदार कल्लाप्पा आवाडे हे विजयी झाले. श्री. आवाडे यांच्या विरोधात त्यावेळी कै. माने यांच्या स्नूषा व नूतन खासदार धैर्यशील यांच्या मातोश्री श्रीमती निवेदीता माने अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या होत्या, त्यांना दोन लाख मते पडली. 1999 साली श्रीमती माने याही खासदार झाल्या. त्यानंतर कै. माने यांचे नातू व श्रीमती माने यांचे पुत्र धैर्यशील हे 2019 मध्ये खासदार झाले. 

कै. माने पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना दिल्लीतील '29 मीना बाग' हे शासकीय निवासस्थान मिळाले. त्यावेळी धैर्यशील हे अवघ्या 8-10 वर्षाचे असतील. तेव्हापासून तेही आजोबांसोबत दिल्लीला जायचे. मे महिना व दिवाळीच्या सुट्टीत धैर्यशील यांचा महिनाभर मुक्काम याच वास्तुत असायचा. राजकारणात धैर्यशील हे स्वतःच्या आजोबांनाच आदर्श मानतात. किंबहुना राजकारणाचे बाळकडूही त्यांनी आजोबांकडूनच घेतले आहे. दिल्लीतील वास्तव्यात आजोबांसोबत राहून त्यांच्याकडून ते बरेच काही शिकले आहेत. 

सद्या या वास्तूत कोण रहाते हे माहित नाही पण तीन खोल्यांची ही वास्तुच माझ्यासाठी योग्य आहे, कारण त्या वास्तूत आजोबांच्या स्मृती मी पाहतो म्हणून हीच वास्तू मिळावी म्हणून धैर्यशील यांनी निवासस्थान वाटप समितीला तसे पत्र दिले आहे. 

17 व्या लोकसभेत तब्बल 300 खासदार हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. याचा अर्थ तेवढ्याच माजी खासदारांना घरे सोडावी लागणार आहेत. ही घरे रिकामी होत नाहीत तोपर्यंत नव्या खासदारांची सोय त्या त्या राज्यांच्या सदनात करण्यात आली आहे. ही निवासस्थाने रिकामी झाल्यानंतर संबंधितांना ती देण्यात येतील तोपर्यंत धैर्यशील यांना महाराष्ट्र सदनातच मुक्काम ठोकावा लागेल.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख