खासदार बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांचे मनोमीलन औटघटकेचे

युतीची सत्ता आली असती,तर शहराला किमान राज्यमंत्रीपद तरी मिळाले असते. कारण गेल्यावेळीच तो क्लेम घट्ट होता. मात्र,दोघांच्या भांडणात ऐनवेळी तो मावळला देण्यात आला होता.
खासदार बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांचे मनोमीलन औटघटकेचे

पिंपरीः राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय चित्रही उलटपालट होणार आहे. युती तुटल्यात जमा झाल्याने शहरातील आमदार लक्ष्मण जगताप व खासदार श्रीरंग बारणे यांचे मनोमीलन औटघटकेचे ठरले आहे. चार महिन्यांतच त्यांची तोंडे दोन दिशांना झाली आहेत.

दरम्यान,बदलत्या राजकीय स्थितीचा मोठा फटका शहरालाही बसला आहे. राज्यातील भाजपची सत्ता गेल्याने शहराला मिळणारे मंत्रीपदही आता मिळणार नाही.

लोकसभेला शहराचे कारभारी असलेले भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व शिवसेनेचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांच्यातील दहा वर्षातील हाडवैर संपुष्टात आले होते. तसेच भोसरीचे आमदार महेशदादा आणि शिवसेनेचे माजी खासदार खासदार शिवाजीराव आढळरावदादा यांचाही पाच वर्षाचा अबोला मिटून त्यांचेही मनोमीलन झाले होते.

मात्र,विधानसभा निकाल व त्यानंतरची राजकीय घडामोड यामुळे युतीवर पाणी फिरले. पिंपरीची शिवसेनेची जागा गेली. तर,चिंचवडला शिवसेना बंडखोरामुळे भाजप उमेदवाराचे लीड निम्याने कमी झाले. त्यामुळे अगोदरच युतीत शहरात काहीसा दुरावा आला होता. त्यात शिवसेनेने फारकत घेत दोन्ही कॉंग्रेसशी घरोबा केला आणि युती तुटल्याची औपचारिकताच काय ती बाकी असल्याने का रे दुरावा म्हणण्याची पाळी भाजपवर आली आहे. बदलत्या राजकीय स्थितीमुळे दोन्ही दादा व अप्पा भाऊंत पुन्हा दूरी निर्माण होणार आहे.

नव्या समीकरणाचा शहराला मोठा फटका बसला आहे. युतीची सत्ता आली असती,तर शहराला किमान राज्यमंत्रीपद तरी मिळाले असते. कारण गेल्यावेळीच तो क्लेम घट्ट होता. मात्र,दोघांच्या भांडणात ऐनवेळी तो मावळला देण्यात आला होता. राज्यातील बदलत्या राजकारणाचे दुरगामी परिणाम शहरात दिसून येणार आहे. त्याची सुरवात या महिन्याच्या पालिका मासिक सभेपासून होण्याचे संकेतही मिळाले आहेत. गेली अडीच वर्षे रेटून कारभार केलेल्या भाजपविरुद्ध राष्ट्रवादीच्या जोडीला आता शिवसेनाही येणार असल्याने पालिकेत तसा कारभार सत्ताधाऱ्यांना आता करणे अवघड होऊन बसले आहे. सभागृहाबाहेरही सत्ताधाऱ्यांविरुद्धचा विरोध वाढणार आहे. त्यात राज्यातीलही सत्ता गेल्याने तिकडची त्यांची रसदही बंद होणार आहे. उलट त्यांची कोंडीच केली जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तविली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com