गल्लीतील "दादा'च्या पराभवासाठी दिल्लीतील "दादा' प्रचाराला! 

नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सरासरी 76.89 टक्के मतदान झाले.15 हजार 158 पैकी 11 हजार 655 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. उद्या (ता.27) सकाळी दहा वाजता जुन्नर येथील शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयात मतमोजणीस सुरवात होईल,
गल्लीतील "दादा'च्या पराभवासाठी दिल्लीतील "दादा' प्रचाराला! 

नारायणगाव : जुन्नर तालुक्यात अग्रेसर असलेल्या नारायणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रथमच तीन पॅनेलमध्ये तिरंगी व अटीतटीचा सामना रंगला होता.गल्लीतील दादांचा (चंद्रशेखर कोऱ्हाळे) पाडाव करण्यासाठी ग्रामपंचायत सारख्या निवडणुकीत दिल्लीतील दादांनी(खासदार शिवाजीराव आढळराव पाटील) स्वतः प्रचार सभा घेतल्याने येथील ग्रामपंचायत निवडणुकी बाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

सरपंच कोण होणार ? कोणाचा त्रिफळा उडणार ? कोणत्या दादांची सरशी होणार ? या बाबत आज दिवसभर चर्चा सुरू होती. दरम्यान तीनही पॅनेल प्रमुखांनी विजयाचा दावा केल्याने निवडणूक निकाला बाबत मोठी उत्कंठा निर्माण झाली आहे. 

नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सरासरी 76.89 टक्के मतदान झाले.15 हजार 158 पैकी 11 हजार 655 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. उद्या (ता.27) सकाळी दहा वाजता जुन्नर येथील शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयात मतमोजणीस सुरवात होईल, अशी माहीती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन चौरे यांनी दिली. डिसेंबर 2012 ला झालेल्या मागील निवडणुकीत 74.90 टक्के मतदान झाले होते.

 
या वेळी सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे.सरपंचपदासाठी पाच उमेदवार तर सदस्यांच्या सतरा जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गावातील 11 हजार 655 मतदानापैकी 5 हजार 546 स्त्री तर 6 हजार 109 पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

सर्वांत जास्त 81.57 टक्के मतदान प्रभाग सहा मध्ये तर सर्वांत कमी 71.34 टक्के मतदान प्रभाग एकमध्ये झाले. प्रभागनिहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे(कंसात मतदानाची टक्केवारी): प्रभाग क्र.1: 1 हजार 648 ( 71.34 टक्के), प्रभाग क्र.2: 1 हजार 718 (76.93 टक्के), प्रभाग क्र.3 : 1 हजार 953 (73.07 टक्के), प्रभाग क्र.4: 1 हजार 649 (77.30 टक्के), प्रभाग क्र.5: 1 हजार 578 (79.25 टक्के), प्रभाग क्र.6: 2 हजार 59 (81.57 टक्के). 

सरपंचपदासाठी थेट निवडणूक होत असल्याने व प्रथमच तीन पॅनेलमध्ये लढत झाल्याने नारायणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकाला बाबत उत्कंठा शिगेला पोचली आहे. माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर कोऱ्हाळे यांच्या नेतृत्वाखालील श्री मुक्ताई ग्रामविकास पॅनेल,सदस्य योगेश पाटे यांच्या नेतृत्वाखालील मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनेल, माजी उपसरपंच संतोष वाजगे यांच्या नेतृत्वाखालील श्री मुक्ताई हनुमान जनसेवक पॅनेल या तीन पॅनेलमध्ये चुरशीचा सामना रंगला होता. 

सरपंचपदासाठी पाच उमेदवार तर सदस्याच्या सतरा जागांसाठी सहा प्रभागातून पंचेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कोऱ्हाळे या भागात दादा या नावाने परिचित आहे. मागील सलग पाच निवडणुकांत कोऱ्हाळे यांनी एकहाती विजय मिळवला आहे. कोऱ्हाळे यांच्या ताब्यात बावीस वर्ष ग्रामपंचायतीची सत्ता होती. कोऱ्हाळे यांच्यावर गैरकारभाराचे व एकाधिकारशाहीचे आरोप करून नोव्हेंबर 2015 मध्ये त्यांच्या पॅनेलमधून निवडून आलेल्या पंधरा पैकी बारा सदस्यांनी बंड करुण ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत केली होती. कोऱ्हाळे यांचे एकेकाळचे जिवलग सहकारी संतोष वाजगे व कट्टर विरोधक योगेश पाटे यांनी कोऱ्हाळे यांचा पाडाव करण्यासाठी स्वतंत्र पॅनेल तयार केले होते. यामुळे गावातील ज्येष्ठ गावकरभारी विरुद्ध कोऱ्हाळे असे निवडणुकीत चित्र तयार झाले होते.दोनही पॅनेल प्रमुखांनी कोऱ्हाळे यांच्यावर भ्रष्ट कारभाराचा भडिमार केला होता. मात्र कोऱ्हाळे यांनी संयमाने आरोपाचे खंडन करुण दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना हाताशी धरून विरोधकांचा सामना केला.या मुळे कोऱ्हाळे यांची विजयाची परंपरा खंडित होणार का या बाबत मोठी उत्कंठा निर्माण झाली आहे. 

सरपंचाबाबत उत्कंठा 

सरपंचपदासाठी अमित कोऱ्हाळे(श्री मुक्ताई ग्रामविकास पॅनेल),योगेश पाटे (मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनेल),संतोष वाजगे(श्री मुक्ताई हनुमान जनसेवक पॅनेल)यांच्यातच अंतिम चुरशीची लढत होणार आहे. पाटे यांच्या प्रचारासाठी खासदार आढळराव पाटील यांनी प्रचारसभा घेतल्याने सरपंच कोण होणार या बाबत ग्रामस्थांमध्ये उत्कंठा निर्माण झाली आहे. 

विद्यमान सदस्यांचा जीव टांगणीला 

विद्यमान सदस्य अमित कोऱ्हाळे, योगेश पाटे, संतोष वाजगे, गणेश पाटे, रामदास अभंग, सीमा बोऱ्हाडे, माधुरी वालझाडे, माजी सरपंच जयश्री मेहेत्रे, ज्योती दिवटे, उपसरपंच संतोष पाटे हे दहा विद्यमान सदस्य निवडणूक रिंगणात आहेत. या पैकी वाजगे हे सलग वीस वर्ष सदस्य आहेत. चुरशीच्या तिरंगी लढतीत विजयी होणार का या बाबत या सदस्यांचा जीव टांगणीला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com