mote and tanaji sawant | Sarkarnama

माजी आमदार मोटे यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी तानाजी सावंत यांचे मंत्रिपद हुकले ?

तानाजी जाधवर
सोमवार, 30 डिसेंबर 2019

कदाचित प्रा.सावंत यांची ही आक्रमक राजकीय भूमिका माजी आमदार मोटे यांना भविष्यात त्रासदायक ठरणार हे निश्‍चित होते. याचा विचार करुनच राष्ट्रवादीच्या वरिष्ट नेत्यांनी प्रा. सावंत यांचा पत्ता कट केल्याची चर्चा आहे.

उस्मानाबाद : राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून त्यामध्ये जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळालेले नाही. प्रा. तानाजी सावंत यांचे मंत्रिपदासाठी नाव निश्‍चित मानले जात असताना ऐनवेळी माशी शिंकली कुठे याचीच चर्चा सध्या जिल्ह्यातील शिवसैनिकामध्ये सुरु आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आला असून त्यामध्ये जिल्ह्याला मंत्रीपद मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात काहीशी नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. गेल्या सरकारमध्ये शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रा. तानाजी सावंत यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली होती. 

यावेळी जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा प्रा.सावंत याचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेला होते. अगदी रविवारी रात्रीपर्यंत त्यांचे नाव निश्‍चित मानले जात होते. सोमवारी सकाळी त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आल्याचे समोर आले. ऐनवेळी असे काय घडल की, त्यांचे नाव मागे पडले. त्याला मुख्य कारण स्थानिक राजकारणाच्या घडामोडी मानल्या जात आहेत. माजी आमदार राहुल मोटे यांचे पवार घराण्याशी असलेले अत्यंत निकटचे संबध सुध्दा सावंत यांच्या मंत्रिपदासाठी अडसर बनल्याची चर्चा आहे. 

माजी आमदार राहुल मोटे हे तीन वेळा आमदार झालेले होते. चौथ्यावेळी त्यांना सावंत यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला आहे. या अगोदर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद मोटे याना दिले होते. राहुल मोटे पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ट राहिल्याने त्यांचाही पक्षाने विचार केल्याचे दिसून येत आहे. मधल्या काळात आमदार मोटे यांचे अनेक लोक प्रा. सावंत यानी सेनेमध्ये घेतले होते. महाविकास आघाडीची चर्चा सुरु असतानाही त्यांनी राष्ट्रवादीचे अनेक लोक फोडण्यासाठी यंत्रणा राबविल्याचे चित्र आहे. त्याचा थेट परिणाम सध्या स्थानिक राजकारणावर घडत असल्याचे पाहयला मिळाले होते. 

कदाचित प्रा.सावंत यांची ही आक्रमक राजकीय भूमिका माजी आमदार मोटे यांना भविष्यात त्रासदायक ठरणार हे निश्‍चित होते. याचा विचार करुनच राष्ट्रवादीच्या वरिष्ट नेत्यांनी प्रा. सावंत यांचा पत्ता कट केल्याची चर्चा आहे. प्रा. सावंत याच्या वक्तव्याचा अनेकदा पक्षातील नेत्यांनाही फटका बसल्याचे दिसून आले होते. त्यांचा स्वभाव पाहता ते कोणत्या वेळी काय करतील याबाबत शंकास्पद वातावरण निर्माण झालेले अनेकदा दिसले. त्यांच्या या स्वभावाचा विचार करुन पक्षाने असा निर्णय घेतला असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख