राजीव राजळे गेले हे मन स्वीकारत नाही - आमदार मोनिका राजळे - Monika Rajale | Politics Marathi News - Sarkarnama

राजीव राजळे गेले हे मन स्वीकारत नाही - आमदार मोनिका राजळे

मुरलीधर कराळे : सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 जानेवारी 2018

पती (कै.) राजीव राजळे यांच्या निधनामुळे गेले तीन महिने राजकारणापासून दूर असलेल्या पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांची आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील घरी भेट घेऊन त्यांना धीर दिला. राजकारणात पुन्हा सक्रीय व्हावे, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असे सांगून राजळे यांना मेळाव्यासाठी घेऊन आल्या. या वेळी राजळे यांनी तीन महिन्यानंतर प्रथमच भाषण केले.

नगर :  "कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. आज बाहेर पडण्यास माझे पाय लटपटत आहेत. पण राजीव राजळे गेले हे सत्य स्विकारायला मन तयार होत नाही. त्यांचा आधार असल्यानेच मी कामे करीत होते. आता आधारच गेल्याचे शल्य मनात आहे",असे भावनिक उदगार आमदार मोनिका राजळे यांनी काढताच उपस्थितांना आश्रू आवरता आले नाही.

पती (कै.) राजीव राजळे यांच्या निधनामुळे गेले तीन महिने राजकारणापासून दूर असलेल्या पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांची आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील घरी भेट घेऊन त्यांना धीर दिला.

राजकारणात पुन्हा सक्रीय व्हावे, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असे सांगून राजळे यांना मेळाव्यासाठी घेऊन आल्या. या वेळी राजळे यांनी तीन महिन्यानंतर प्रथमच भाषण केले.

मेळाव्यात बोलताना मुंडे यांनी जिजाऊ, अहल्यादेवी होळकर यांची उदाहरणे देत राजळे यांना धीर दिला. सोळा वर्षांचा मुलगा जिजाऊंनी बाहेर कसा पाठवू, असा विचार केला असता तर स्वराज्याची स्थापना झाली नसती. आमदार राजळे या लाखो जनतेच्या पोशिंद्या आहेत. त्यांना बाहेर पडावेच लागेल.

राजळे कुटुंबाने जपलेला समाजसेवेचा वसा घ्यावा लागेल. आमदार राजळे यांच्या मागे मी खंबीरपणे उभी आहे. त्यांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली.

आमदार राजळे यांनी घराबाहेर पडून राजकारण, समाजकारणात पुन्हा सक्रीय व्हावे, यासाठी पाथर्डी, शेवगावमधील अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. आमदार राजळे यांना वारंवार भेटून उपयोग झाला नाही.

पण कार्यकर्त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर पंकजा मुंडे यांची परळी येथे भेट घेऊन तुम्हीच आमदार राजळे यांना घराबाहेर काढत समाजकारणात सक्रीय करा, अशी विनंती केली. तेव्हा मुंडे यांनी राजळे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली.

नगरच्या सभेत राजळे स्टेजवर

नगरला सुरू असलेल्या साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा या उपक्रमांतर्गत मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या वेळी आमदार मोनिका राजळे व्यासपीठावर होत्या.

सर्व नेत्यांनी राजळे यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करीत त्यांनी राजकारणात सक्रीय व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी मुंडे यांनी राजळे यांना आपली खंबीर साथ असल्याचे सांगून मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या घराबाहेर पडतील. माझी त्यांना खंबीर साथ आहे, असे सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख