mohol, ghate and rasane front runner for pune mayor | Sarkarnama

विधानसभेसाठी डावललेले मोहोळ, घाटे आणि रासने महापौरपदासाठी आघाडीवर

ज्ञानेश सावंत
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

भाजप श्रेष्ठी कोणाच्या पदरात महापौरपदाची माळ घालणार?

पुणे : पुणे महापालिकेतील महापौरपद खुल्या गटासाठी (सर्वसाधारण) आरक्षित झाल्याचे जाहीर होताच या पदावर विराजमान होण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांत चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत पक्षानेच हुलकावणी दिल्याने भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मुरलीधर मोहोळ, हेमंत रासने यांच्यासह धीरज घाटे, वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे आणि रेश्‍मा भोसले यांची नावे चर्चेत आली आहेत. राज्यातील सत्तेच्या नव्या समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर अभ्यासू आणि अनुभवी म्हणून मोहोळ यांचे नाव आघाडीवर असल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात येत आहे. येत्या 22 नोव्हेंबरला नव्या महापौराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.

 
महापालिकेत भाजपची सत्ता असून, या पक्षाकडे 99 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौरपदासह सर्व पदाधिकारी भाजपचेच आहेत. महापौरपद मुक्ता टिळक यांची महापौरपदाची मुदत संपत आल्याने त्यासाठी बुधवारी आरक्षण सोडत झाली. तित, हे पद खुल्या गटासाठी आरक्षित झाल्याने पुण्याचा नवा महापौर कोण ? याची चर्चा रंगली आहे. तेव्हाच, पक्षातील जुन्यांसोबत काही नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. 

विधानसभेच्या मागील (2014) च्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाल्याने अनुभवी नगरसेवकाला महापौरपदाची संधी देण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न आहे. त्यावरून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मोहोळ यांच्या नावावर एकमत होऊ शकते, असा होरा आहे.

कोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असतानाही पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीमुळे मोहोळांचा पत्ता कट झाला. मोहोळ हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर स्थायीचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्यासाठी सलग दोन वर्षे "फिल्डिंग' लावलेल्या रासने यांना स्थायीच्या अध्यक्षपदासह कसब्यातील उमेदवारीनेही हुलकावणी दिली आहे. रासनेंचीही तिसरी टर्म आहे. याशिवाय, महापौरपदाच्या शर्यतीत आलेले घाटेही हेही कसब्यातून इच्छुक होते. सध्या मुक्ता टिळक यांच्याकडे महापौरपद असल्याने आता पुन्हा महिलेलाच संधी मिळेल, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. तरीही तापकीर, नागपुरे आणि भोसले इच्छुक आहेत. याशिवाय, नव्या चेहऱ्याला संधी देत भाजप नवा प्रयोग करणार का ? याचीही उत्सुकता आहे. 
विधानसभा निवडणुकीतील पडझड लक्षात घेता, नव्याने संघटनात्मक बांधणी करून पक्षाची ताकद वाढेल, हे गाणित मांडून नव्या महापौराची निवड केली जाण्याची शक्‍यता आहे.

शहरनिहाय महापौर सोडत
 • मुंबई- सर्वसाधारण
 • पुणे - सर्वसाधारण
 • नागपूर - सर्वसाधारण
 • ठाणे- सर्वसाधारण
 • नाशिक - सर्वसाधारण
 • नवी मुंबई - सर्वसाधारण महिला
 • पिंपरी चिंचवड - सर्वसाधारण महिला
 • औरंगाबाद- सर्वसाधारण महिला
 • कल्याण डोंबिवली - सर्वसाधारण
 • वसई विरार- अनुसूचित जमाती
 • मिरा भाईंदर-अनुसुचित जाती
 • चंद्रपूर - सर्वसाधारण महिला
 • अमरावती- बीसीसी
 • पनवेल- सर्वसाधारण महिला
 • नांदेड-बीसीसी महिला
 • अकोला - सर्वसाधारणमहिला
 • भिवंडी- खुला महिला
 • उल्हासनगर- ओपन
 • अहमदनगर-  अनुसूचित जाती (महिला)
 • परभणी- अनुसूचित जाती (महिला)
 • लातूर - बीसीसी सर्वसाधारण
 • सांगली- ओपन
 • सोलापूर-बीसीसी महिला
 • कोल्हापूर-बीसीसी महिला
 • धुळे - बीसीसी सर्वसाधारण
 • मालेगाव - बीसीसी महिला
 • जळगाव खुला महिला

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख