बबनदादा आणि संजय शिंदेंची फडणविसांची वाढती जवळीक मोहिते पाटलांसाठी डोकेदुखी?

बबनदादा आणि संजय शिंदेंची फडणविसांची वाढती जवळीक मोहिते पाटलांसाठी डोकेदुखी?

पुणे : पूरग्रस्तांना मदत करण्याचे निमित्ताने सोलापूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने पुन्हा आता शिंदे बंधूंबद्दल राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मात्र या शिंदे बंधूंचे मुख्यमंत्र्याच्या जवळ जाणे ही विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी तर डोकेदुखी ठरणार नाही, अशी शंका आता मोहिते समर्थक व्यक्त करीत आहेत.

मोहिते पाटील आणि शिंदे यांचे अजिबात जमत नाही. सोलापूर जिल्हा परिषदेतील मोहिते गटाचे वर्चस्व शिंदेंनी मोडून काढले. तसेच मोहिते पाटलांचे जिल्ह्यावरील वर्चस्व कमी करण्यात शिंदेंचा मोठा वाटा होता. बबनदाद शिंदे यांनी अजित पवार यांच्या साथीने मोहिते पाटलांच्या ताकदीला नख लावल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. 

राष्ट्रवादीने केलेल्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मोहिते पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला. त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असू शकतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र शिंदे हेच भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्याने मोहिते पाटलांची इकडे आड आणि तिकडे विहिर, अशी तर अवस्था होणार नाही ना, याची शंका आहे. अद्याप शिंदे यांनी कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. मात्र नुसत्या चर्चेनेच मोहिते समर्थकांत अस्वस्थता आहे.

सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतलेला असतानाही त्यांना भेटण्याऐवजी शिंदे बंधूंनी मुख्यमंत्र्यांडे आपली मदत मुख्यमंत्र्यांकडे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवलेले संजयमामा यांनी 11 लाख तर माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे यांनी 10 लाख रुपये पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्तता निधीला  फडणवीस यांच्याकडेच सुपूर्त केला.

लोकसभा निवडणूकीनंतर दोन्ही शिंदे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्येही आमदार बबनदादा शिंदे गैरहजर होते. तेव्हापासूनच बबनदादा शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करतील, या चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर आता मदतनिधीचं निमित्त साधत दोन्ही शिंदे बंधूंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीतील हे  दोन नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, या चर्चेला आणखीनच जोर मिळाला आहे.

अर्थात राष्ट्रवादीनेही मुख्यमंत्री निधीला 50 लाख रूपयांची देणगी दिली होती. त्यामुळे या भेटीत राजकीय काही नसल्याचा दावा शिंदे बंधू करू शकतात. मात्र त्यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीला धस्स झाले, हे मात्र खरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com