Mohite family"s women representatives active in politics | Sarkarnama

सहकारमहर्षींची नात - नातसुना राजकारणात सक्रिय

मनोज गायकवाड
गुरुवार, 4 मे 2017

मोहिते घराण्यातील या तीनही महिला लोक प्रतिनिधीकडेचांगले संभाषण कौशल्य आहे. कोणत्याही कार्यक्रमात आपला मुद्दा पटवून देण्यात त्या यशस्वी होताना दिसत आहेत. मोहिते-पाटील परिवाराचा राजकीय व सामाजिक कार्याचा त्यांना वारसा लाभला आहे. असे असले तरी या तिघींकडेही स्वतंत्र वैचारिक दृष्टिकोन आहे.

अकलूज : मोहिते घराण्यातील तीन महिला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारणात हिरीरीने भाग घेत आहेत . 

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी या वेळी मोहिते-पाटील परिवारातील दोन महिलांची उमेदवारी पुढे आली. त्या विजयी झाल्या आणि आता राजकारणात सक्रियही झाल्या आहेत. पंचायत समितीचे सभापतिपद देखील याच परिवारातील महिलेकडे आहे. त्यामुळे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची नात आणि नातसुना तालुका आणि जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या निवडणूक आरक्षण सोडतीमध्ये तालुक्‍यात खुल्या प्रवर्गातील एकही गट आरक्षित नव्हता. त्यामुळे मोहिते-पाटील परिवारातील नेत्यांना ही निवडणूक लढविता आली नाही. या परिस्थितीत मोहिते-पाटील परिवारातील दोन महिलांची उमेदवारी पुढे आली.

 जिल्हा परिषदेत पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळलेल्या धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पत्नी शीतलदेवी या अकलूज गटाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तर ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते-पाटील यांच्या कन्या स्वरूपाराणी या बोरगाव गटाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. 

पंचायत समितीचे सभापतिपद या वेळी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. त्या जागेवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या सूनबाई वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांची वर्णी लागली आहे. 

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या दोन सूनबाईंनी यापूर्वी राजकारणात आपला प्रभाव दाखविला आहे. स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते-पाटील यांनी सरपंचपद तर पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. त्यानंतर आता बदलत्या आरक्षणामुळे आणि राजकीय परिस्थितीमुळे मोहिते-पाटील परिवारातील महिलांना जिल्ह्याच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळाली आहे. 

डॉटर मॉम संघटना आणि शिवरत्न फाउंडेशनच्या माध्यामातून गेली काही वर्षे शीतलदेवी या अनेक उपक्रमांचे आयोजन करीत आहेत. तर स्वरूपाराणी या शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रमांचे आयोजन करीत आल्या आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनात या दोघींचा हातखंडा आहे. 

 त्यांच्या जोडीला पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी यांची आता भर पडली आहे. सभापतिपदाचा कार्यभार घेतल्यापासून वैष्णवीदेवी यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्या बैठका घेऊन कामाच्या नियोजनावर भर दिला आहे. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्यकुशलतेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकला आहे. 

मोहिते घराण्यातील या तीनही महिला लोक प्रतिनिधीकडेचांगले संभाषण कौशल्य आहे. कोणत्याही कार्यक्रमात आपला मुद्दा पटवून देण्यात त्या यशस्वी होताना दिसत आहेत. मोहिते-पाटील परिवाराचा राजकीय व सामाजिक कार्याचा त्यांना वारसा लाभला आहे. असे असले तरी या तिघींकडेही स्वतंत्र वैचारिक दृष्टिकोन आहे. मात्र, आता त्यांना अपेक्षांची पूर्तता करण्याचे दायित्व निभावायचे आहे. अकलूज परिसरात कोणताही कार्यक्रम असला तरी या तिघींना आमंत्रित करण्याकडे आता नागरिकांचा कल वाढला आहे.

विकासाचा निर्धार
स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील आणि वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटील या तिघींचे पदार्पण एका वेगळ्या राजकारणाची नांदी ठरू पाहात आहे. सिद्ध आहोत आम्ही तिघी, खेचून आणून विकास निधी ,या निर्धाराने खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल सुरू आहे. घराण्याचे वलय आणि राजकीय प्रतिष्ठा ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र, बदलत्या राजकीय स्थितीत त्या आपला प्रभाव कसा टिकवून ठेवतात, हे पाहावे लागणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख