मोदींनी अच्छे नव्हे तर लुच्चे दिन आणले, राजू शेट्टींचा हल्लाबोल 

मोदींनी अच्छे नव्हे तर लुच्चे दिन आणले, राजू शेट्टींचा हल्लाबोल 

नाशिक ः पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अच्छे दिन सांगत जनतेला लुच्चे दिन आणले आहेत. सध्या विधानसभा, लोकसभेत बसलेले बॅंका, कारखाने लुटून खाणारे दरोडेखोर आहेत. त्यामुळे जनतेला लुटणारे सर्वपक्षीय लोक एकत्र असतील, तर त्यांचा बिमोड करण्यासाठी आपणही एक झाले पाहिजे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

कसबे सुकेणे (ता. निफाड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस, कांदा, द्राक्ष स्वाभिमानी संघर्ष सभा झाली. यावेळी शेट्टी बोलत होते. 

शेट्टी म्हणाले, "" गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. सत्तेवर येताच त्यांनी अच्छे दिन तर नाही मात्र शेतकरी, जनतेला लुच्चे दिन दाखवले.या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. भाजप सरकारमुळेच शेतकरी देशोधडीला लागला. शेतकरी आणि कामगारांचे हजारो कोटी रुपये लुटणाऱ्या लोकांना धडा शिकवावा लागेल. गेंड्याची कातडी धारण करणाऱ्या राज्यकर्त्यांना झुकविण्यासाठी संघर्ष आणि एकजूट उपयुक्त आहे.'' 

साखरेचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारला भाग पाडावे लागेल. उसाची आधारभूत किंमत शेतकऱ्यांना वेळेत न देणाऱ्या कारखान्यांना कायदा असूनही न्याय मिळत नसेल, तर संघर्षाशिवाय पर्याय नाही, असेही म्हणाले. उपस्थितांना भावनिक आवाहन करताना म्हटले, की जनतेच्या पैशांवर दरोडा घालणाऱ्या नेत्यांना घरी बसवून शेतकरीहितासाठी झटणाऱ्यांना निवडून द्यावे. 

या वेळी युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, प्रदेश युवती महिला आघाडीच्या अध्यक्षा पूजा मोरे, संदीप जगताप, दशरथ सावंत, राजेंद्र मोगल, जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, दीपक भदाणे यांचीही भाषणे झाली. 

विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महंत अरविंदराज सुकेणकर, तेजस्विनी शिंदे, संजय रहाणे, संतोष पवार, वंदना देवकर, धनराज जाधव, संजय आहेर, संजय गायकवाड, नरहरी महाराज घोडे यांना समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांनी सन्मानित केले. शशांक शिंदेनिर्मित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोबाईल ऍपचे शेट्टी यांनी लोकार्पण केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com