लोकशाहीने व्होट बॅंकेचे राजकारण संपुष्टात आणले - नरेंद्र मोदी

 लोकशाहीने व्होट बॅंकेचे राजकारण संपुष्टात आणले - नरेंद्र मोदी

वाराणसी : लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता मतदारांच्या "केमिस्ट्री'ने राजकीय गणितावर मात केली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. वाराणसीतून प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. मोदी म्हणाले की, काम आणि कामगार हे चमत्कार घडवितात. आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय हे तळागळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे असून, त्यांनी सरकारच्या योजना, धोरण आणि कार्यक्रम हे जनतेपर्यंत पोचविले. त्यांच्या जनजागृती मोहिमेमुळेच विजय शक्‍य झाला. त्यामुळेच उत्तर प्रदेशातून देशाची वाटचाल कळत आहे. देशातील लोकशाहीने व्होट बॅंकेचे राजकारण संपुष्टात आणले आहे. व्होट बॅंकेच्या राजकारणामुळे आणि दबावामुळे कोणीही खरे बोलण्यास धजावत नव्हते. मात्र, भाजपने हा पायंडा मोडून काढला. जेव्हा दुसरे लोक सत्तेत येतात तेव्हा विरोधकांचे नामोनिशाण राहत नाही. मात्र, जेव्हा भाजप सत्तेत येतो तेव्हा विरोधकांचे अस्तित्व निर्माण होते. त्रिपुराचे उदाहरण घ्या. तेथे तीस वर्षे कम्युनिस्टांची राजवट होती. तेथे विरोधी पक्ष नावालाही नव्हता. मात्र, आज भाजप तेथे सत्तेत आहे. विरोधी पक्षही सक्षम आहे. त्यांचे म्हणणे ऐकले जाते. विरोधकांच्या आवाजालाही महत्त्व देण्याची जबाबदारी घटनेने आपल्याला दिली आहे, असे मोदी म्हणाले. 

राजकीय हिंसाचाराला भाजपचा कार्यकर्ता सर्वाधिक बळी ठरल्याचे मोदी म्हणाले. केरळ असो, काश्‍मीर असो, बंगाल किंवा त्रिपुरा असो. तेथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आहे. केवळ राजकीय संघर्षामुळेच कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. बंगालमध्येही हत्येचा सिलसिला सुरूच आहे. केरळमध्येही हत्या घडवून आणल्या जात आहेत. हिंसेला एकप्रकारे अलिखित मान्यताच दिली आहे. हे भाजपपुढील मोठे आव्हान आहे, असे मोदी म्हणाले. 

देशासाठी मी पंतप्रधान असेन. पण, मी तुमच्यासाठी खासदार आहे. मी तुमचा सेवक आहे असे नरेद्र मोदी यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com