वाराणसीत 'मोदी विरूद्ध प्रियंका'?

सप-बसप आघाडीची घोषणा करत असताना मायावतींनी आता नरेंद्र मोदी- अमित शाह यांची झोप उडेल, असे म्हटले होते.
वाराणसीत 'मोदी विरूद्ध प्रियंका'?

पुणे: प्रियंका गांधी यांनी राजकारणात सक्रिय व्हावे, ही काँग्रेस कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर आज पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी पुर्ण केली. प्रियंका यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करत पुर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. 'प्रियंका कार्ड'मुळे भाजपला झटका बसेल, असा दावा केला जात असताना मोदींना पुरता घाम फोडण्याची तयारी काँग्रेसच्या गोटात सुरू आहे. 

राहूल गांधी यांनी प्रियंका व ज्योतिरादित्य सिंधीया यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी विभागून दिली आहे. यापुर्वीच्या निवडणुकांत प्रियंका फक्त अमेठी, रायबरेली या मतदारसंघात प्रचार करायच्या. यंदा मात्र 40 मतदारसंघात त्यांना प्रभाव दाखवावा लागणार आहे. प्रियंका यांच्या थेट सहभागामुळे वाराणसीचा समावेश असलेली पुर्व उत्तर प्रदेशातील निवडणूक 'मोदी विरूद्ध प्रियंका' अशी होवू शकते आणि या संघर्षात प्रियंका यांचा मोठा उपद्रव मोदींना होईल, असे राजकीय आडाखे आहेत. 

एवढेच नाहीतर वाराणसीत मोदींविरूद्ध प्रियंका यांना थेट रिंगणात उतरवण्यासंदर्भात काँग्रेसमध्ये गंभीर विचार सुरू आहे. प्रियंका यांना सप-बसपने पाठिंबा दिला तर 'मोदी विरूद्ध प्रियंका' ही लढत प्रत्यक्षात होवू शकते. सप-बसपने आघाडी जाहीर करत असताना अमेठी आणि रायबरेलीची जागा विनाअट काँग्रेसला सोडली आहेत. राहूल गांधी, सोनिया गांधी यांना मतदारसंघात अडकून न पडता देशभर फिरता यावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे मायावती यांनी जाहीर केले आहे. त्याचधर्तीवर मायावती- अखिलेश यादव मोदींना मतदारसंघात अडकून ठेवण्याची खेळी करू शकतात. 

सप-बसप आघाडीने गेल्या वर्षभरात झालेल्या तीन पोटनिवडणुकांत आपली ताकद दाखवून दिली आहे. स्वत: मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे सप-बसपपुढे निष्प्रभ ठरले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवूनही काही दिवसांतच भाजपला तीन पोटनिवडणुकांत जोरदार झटके मिळाले, त्याकडे दूर्लक्ष करून भाजपला 2014 सारख्या विजयाचा दावा करता येणार नाही. आदित्यनाथ, केशवप्रसाद यांना स्वत:च्या लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार निवडून आणता आले नाहीत. त्यावेळी सप-बसप जाहीर आघाडी नव्हती. आता जाहीर आघाडी झालीच आहे, शिवाय अजितसिंहांचा आरएलडी, निशाद पार्टी त्यांच्यासोबत आहे. हीच आघाडी मोदींचा रथ उत्तर प्रदेशमध्येच रोखेल, असे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत. त्यातच प्रियंका गांधी सक्रिय होत असल्याने मोदींसमोर मोठे आव्हान उभे राहत आहे. 

काही दिवसांपुर्वी संसदेत राहूल गांधींनी मोदींना मिठी मारून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. ती जबरदस्तीने घेतलेली गळाभेट मोदींची भंबेरी उडवणारी तर राहूल गांधींचा आत्मविश्वास दाखवणारी होती. राहूल गांधींचा स्वभाव पाहता ते संसदेत मोदींशी 'असे' वागतील, याचा कुणालाही अंदाज नव्हता. त्यांची कृती धक्का देणारी होती. त्यानंतर राहूल सातत्याने यश मिळवत पुढे निघाले आहेत. दुसऱ्या बाजूला मोदींची घसरण सुरू आहे. या टप्प्यावर प्रियंका गांधींना मोदींविरोधात उभे केल्यास मोदींची भंबेरीच नाही, तर त्रेधातिरपीट उडेल, यात शंका असण्याचे कारण नाही. 

चार दिवसांपुर्वीच राजद नेते तेजस्वी यादव यांनी वाराणसी लोकसभेवर भाष्य केले होते. सप-बसप आघाडीमुळे मोदींना स्वत: निवडून येणे मुश्कील आहे, असे म्हटले होते. बदलत्या परिस्थितीत प्रियंका प्रत्यक्ष आखाड्यात उतरल्या तर ही लढत देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरू शकते. मोदींचा पराभव हे राहूल गांधींचे स्वप्न आहे आणि ते प्रियंका यांच्या माध्यमातून पुर्ण होणार असेल तर त्याचा मोठा फायदा काँग्रेसला होवू शकतो. इतरत्र काँग्रेस कार्यकर्ते जिद्दीने लढू शकतात. सप-बसपकडून मोदींविरोधात तगड्या उमेदवाराचा शोध सूरू आहे, त्यात प्रियंका गांधी लढणार असतील तर त्यांचे काम सोपे होणार आहे. अशी लढत होवू शकते, असा वाराणसीतील काँग्रेसजणांना अंदाज आहे. त्याप्रमाणे घडलेच तर मोदींची झोप निश्चितपणे उडू शकते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com