पुलवामा हल्ल्यावरून पुन्हा राजकीय वादंग...

पुलवामा हल्ल्यावरून पुन्हा राजकीय वादंग...

नवी दिल्ली : जम्मू काश्‍मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवानांनी प्राणाहुती दिली, त्या दुःखद घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशी त्या घटनेवरून राजकीय धुळवड पहायला मिळाली. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक लाभ कोणाला झाला, असा सवाल विचारल्यावर भडकलेल्या भाजपने, राहूल गांधी कायम दहशतवाद्यांबरोबरच असतात, असा प्रतिहल्ला चढविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र राजकारणापासून दूर रहात, पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांचे बलिदान देश विसरणार नाही व वायाही जाऊ देणार नाही, अशी आदरांजली वाहिली. 

2019 मध्ये आजच्याच दिवशी पुलवामा येथे एका पाकप्रशिक्षित आत्मघाती दहशतवाद्याने जम्मू-श्रीनगर महामार्गावर सीआरपीएफ जवानांच्या काफिल्यावर स्फोटके भरलेल्या कारने हल्ला चढविला, त्या स्फोटात 40 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर सारा देश सुन्न झाला होता. नंतरच्या काही दिवसांतच भारताने सीमापार हवाई हल्ले चढवून पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त केले. यात 200 ते 300 पाक दहशतवादी मारले गेल्याचा दावा हवाई दलाने केला होता. त्यानंतर काही महिन्यांतच लोकसभा निवडणुका झाल्या व मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने 2014 पेक्षा मोठा विजय मिळवताना देशभरात विजयाची पुनरावृत्ती तर केलीच पण प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या गडाला खिंडार पाडून 303 जागा जिंकून केंद्रात पुन्हा सरकार स्थापन केले होते. 

पुलवामा हल्ल्याला एक वर्ष झाल्याच्या दिवशी गांधी यांनी आज सकाळीच ट्‌विट करून, सरकारला पुढील तीन प्रश्न विचारले.1) पुलवामा हल्ल्याचा सर्वांत जास्त फायदा कोणाला झाला 2) हल्ल्याच्या तपासातून काय आढळले व 3) या हल्ल्याला सरकारमधील कोणाची जबाबदारी निश्‍चित झाली. राहूल यांच्या ट्‌विटमधील छुपे राजकीय संदर्भ लक्षात येताच खवळलेल्या भाजपने त्यांच्यावर जबरदस्त प्रतिहल्ला चढविला. कॉंग्रेसचे विधान हा देशासाठी प्राणार्पण करणाऱया शूरवीरांचा व संपूर्ण लष्कराचाच अपमान असल्याचे गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी म्हटले. राहुल व त्यांचा पक्ष कायम लष्कर व जैशसारख्या अतिरेकी संघटनांच्या बाजूने सहानुभूती बाळगूनच बोलतात असे पक्षप्रवक्ते संबीत पात्रा यांनी सांगितले. 
राहुल गांधी यांनी असे बेजबाबदार विधान करून केवळ सरकारच नव्हे तर सुरक्षा दलांवरही संशय व्यक्त केल्याचेही पात्रा म्हणाले असे प्रश्न विचारणारे भौतिकदृष्ट्याच भ्रष्ट असतात असे नसून त्यांचे आत्मेही भ्रष्टच असतात असेही पात्रा म्हणाले. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी, राहूल गांधींना हल्ल्याच्या पहिल्या स्मृतीदिनी असे विधान करताना लाज वाटायला हवी असे ट्‌विट केले. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सकाळीच ट्‌विट करून पुलवामा शहिदांना आदरांजली वाहताना म्हटले की मागील वर्षी पुलवामा येथे आजच्याच दिवशी सुरक्षा दलांवर भ्याड हल्ला झाला होता. त्यात शहीद झालेल्या देशाच्या 40 सुपुत्रांना माझी श्रध्दांजली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com