पुणेरी पगडी आणि पुणेरी सन्मानचिन्ह मोदींच्या पसंतीस!

पुणेरी पगडी आणि पुणेरी सन्मानचिन्ह मोदींच्या पसंतीस!

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे दौऱ्यात हिंजवडी ते शिवाजीनगर म्रेट्रोच्या कामाचे भूमिपूजन केले. या वेळी पुणेकरांनी केलेल्या स्वागताचे मोदींनी कौतुक केले. स्वागतासाठी घातलेली पुणेरी पगडी त्यांनी कार्यक्रम संपेपर्यंत काढली नाही. तसेच अश्वारूढ शिवछत्रपती महाराज, शनिवारवाडा आणि मेट्रो यांच्या प्रतिमा वापरून केलेले सन्मानचिन्हही त्यांच्या पसंतीस उतरले.

मोदी ज्या शहरात जातात तेथील भाषेतील वाक्यांनी आपल्या भाषणाची सुरवात करतात. पुण्यातही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा आवर्जून उल्लेख केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मभूमी म्हणून पुण्याचा उल्लेख त्यांनी पहिल्यांदाच केला.

पुण्यात मध्यंतरी पगडीवरून वाद झाला होता. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात पुणेरी पगडीऐवजी महात्मा जोतिबा फुले वापरत असलेले पागोटे यास अधिक पसंती दर्शवली होती. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्या डोक्यावर पुणेरी पगडी चढविल्याबद्दल नाराजी व्यक्त करत नंतर स्वतः पागोटे त्यांना घातले होते. या कार्यक्रमानंतर साहजिकच वाद व चर्चा सुरू झाल्या.

पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी उपराष्ट्रपती व्यंकया नायडू आले होते. त्यांचे पागोटे की पगडी घालून स्वागत करायचे, यावरून त्यामुळे वाद पेटला होता. सत्ताधारी भाजपने त्यांना पगडीच घातली होती. आता मोदी यांचे स्वागत कसे करणार याची उत्सुकता होती. त्यांना पगडी पुणेरीच घातली. मात्र तिचा `लूक` परंपरागत पगडीचा येणार नाही, अशी काळजी घेतली. या पगडीला मण्यांच्या अनेक माळा लावल्या होत्या. त्यामुळे ती पुणेरी वाटत नव्हती, हे मात्र खरे.

मोदींना सन्मानचिन्हाची जबाबदारी भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी घेतली होती. त्यांच्याच मतदारसंघात हा कार्यक्रम होता. त्यांच्या संकल्पनेतून हे सन्मानचिन्ह तयार करण्यात आले. त्यात अश्वारूढ शिवाजी महाराज, शनिवारवाडा आणि मेट्रो यांच्या प्रतिकृतींचा वापर करण्यात आला. हे सन्मानचिन्ह पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मोदींना भेट देण्यात आले. पंतप्रधानांच्या टिमने ते आवर्जून दिल्लीला नेले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com