अपयश झाकण्यासाठीच मोदी सरकारचा जाहिरातीवर २२०० कोटी खर्च - सचिन पायलट

राजकारणात शिवसेनेची दुटप्पी भूमिकाराज्यात व केंद्रात सत्तेमध्ये सहभागी व्हायचे आणि शेतकरीप्रकरणी सरकारवर टीका करायची असे सध्या शिवसेेनेचे राजकारण सुरू आहे. केंद्रात व राज्यात सरकारची भूमिका पटत नसेल तर सरकारमध्ये कशाला राहता? एकीकडे सत्तेचा मोहही सुटत नाही आणि सत्तेत राहून विरोधकासारखे वागायचे अशी सध्या शिवसेनेकडून राजकारणात दुटप्पी भूमिका वापरली जात असल्याची टीका राजस्थान कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी केली.
sachin-pilat-
sachin-pilat-

मुंबई :  केंद्रातील भाजपा सरकारची तीन  वर्षे पूर्ण झाली आहेत . मोदी सरकारच्या काळात सर्वच आघाड्यांवर देशाची परिस्थिती भयावह बनली आहे. सरकारला कारभारात अपयश आले असून हेच अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडूनबावीसशे  कोटी रूपयांच्या जाहिराती देवून स्वत:ची पाठ थोपटविण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका राजस्थान कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी केली.

केंद्रातील मोदी सरकारच्या ३ वर्षाच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी मुंबई प्रदेश कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सचिन पायलट बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे, माजी आमदार चरणजितसिंह सप्रा व कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रामध्ये सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने खूप आश्‍वासने दिली. शेतकर्‍यांना ५० टक्के फायदा होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल अशी विविध आश्‍वासने देण्यात आली होती. पण आज महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आत्महत्या करावी लागत आहे. मध्यप्रदेशातील निशस्त्र शेतकर्‍यांवर गोळीबार होवून त्यांना मरणाला सामोरे जावे लागत आहे. 


उत्तर प्रदेशात सरकार येताच तेथील शेतकर्‍यांना ३६ हजार कोटीची कर्जमाफी देण्यात आली. हाच निर्णय मध्यप्रदेश, राजस्थान व महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या बाबतीत का घेतला जात नाही. उत्तर प्रदेशात व महाराष्ट्रात तेच सरकार असताना एका शेतकर्‍याला कर्जमाफी व दुसर्‍या भागातील शेतकरी आत्महत्या करूनही निर्णयास विलंब कशासाठी असा प्रश्‍न सचिन पायलट यांनी यावेळी उपस्थित केला.

मनमोहनसिंग १० वर्ष पंतप्रधान असताना एकदाही पाकिस्तानला गेले नाहीत. याउलट मोदी त्या ठिकाणी गेले. मोदी गेल्यावरही ठिकठिकाणी सीमेवर गोळीबार वाढला. उरी, पठाणकोटसारख्या घटनांमध्ये वाढ झाली. सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले.  दहशवाद वाढलाय, अतिरेकी कारवाया वाढल्यात. जम्मूमध्ये लोक खुलेआमपणे पाकीस्तानचा झेंडा घेवून फिरू लागले आहेत.

 कॉंग्रेसच्या काळात काश्मिरमध्ये ६७ ते ७० टक्के मतदान होत असे. भाजपाच्या काळात ५ ते ६ टक्के मतदान झाले आहे. निवडणूका पुढे ढकलाव्या लागल्या. आत्मसन्माची व राष्ट्रवादाची तसेच देशभक्तीची भाषा बोलणार्‍या भाजपाला कारभारात सर्वच आघाड्यांवर अपयश आले. याउलट भाजपाविरोधात बोलणारा देशद्रोही हा नवीन निकष जनसामान्यांवर रूजविण्याचे प्रयत्न करण्यात आल्याची टीका पायलट यांनी यावेळी केली.

मध्यप्रदेशातील शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी गेले होते,. त्यांना तेथे सभा घ्यायची नव्हती. भाषण करायचे नव्हते. तरीही त्या ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला. शेतकर्‍यांना भेटू न देता अटक करण्यात आली. 

भाजपाचा शेतकर्‍यांशी संवाद होत नसल्याचे सर्वच ठिकाणी निदर्शनास आले आहे. एकीकडे शेतकर्‍यांवर गोळीबार, शेतकरी संपावर, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या आणि या पार्श्‍वभूमीवर केंद्रात ३ वर्षे पूर्ण झाली म्हणून भाजपा विविध ठिकाणी उत्सव साजरा करण्यात व्यग्र असल्याचे पायलट यांनी यावेळी सांगितले.

भाजपा सरकार शेतकर्‍यांना समाधानी ठेवू शकले नाही. दोन कोटी रोजगार देण्याची भाषा करणार्‍या भाजपाला आतापर्यत फक्त २ लाख ३० हजार रोजगार देता आले. विद्यापिठात पोलिसी बळाचा वापर केला जात आहे. डिजिटल इंडिया कागदावरच राहीली. आयटी क्षेत्रातही बेरोजगारी वाढली. दलितांवर, महिलांवर अत्याचार वाढले.


 देशात दर नवव्या व मिनिटाला ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल होत आहेत. याउलट उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री गाईला चारा कधी घालतात. घरवापसी, प्रेमिकांना मारहाण या भावनिक घटनांना प्रसिध्दी दिली जात आहे. देशाच्या सीमारेषा असुरक्षित झाल्या आहेत. देशाचा कारभार नागपुरातून चालविला जात आहे. आरक्षण संपविण्याची भाषा नागपुरातून बोलली जात आहे. मोदी सरकार कॉंग्रेसच्याच योजना नाव बदलून पुढे चालवित असल्याची टीका पायलट यांनी यावेळी केली.

हे सरकार संवेदनशून्य झाले असून सर्वच आघाड्यावर सरकारला अपयश आले आहे. महिलांना, युवकांना व शेतकर्‍यांनाही या सरकारने वार्‍यावर सोडले असल्याचे पायलट यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com