महात्मा गांधींच्या भारतात हाताने डोक्‍यावर मैला वाहण्याची प्रथा कायम ; मोदी सरकारची राज्यसभेत कबुली

 महात्मा गांधींच्या भारतात हाताने डोक्‍यावर मैला वाहण्याची प्रथा कायम ; मोदी सरकारची राज्यसभेत कबुली

नवी दिल्ली : चंद्रावर आणि मंगळावर जाण्याची भाषा आणि पाच अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याच्या गर्जना होत असल्या तरी त्याच भारतात स्वांतत्र्याला सव्वासात दशके होऊनही हाताने व डोक्‍यावरून मैला वाहण्याची घृणास्पद प्रथा आजही कायम आहे. याबाबत कायदे बनलेले असले तरी ते प्रभावीपणे लागू होण्यासाठी आणखी कालावधी लागेल अशी कबुलीच केंद्र सरकारने आज राज्यसभेत दिली. ही अमानवीय पध्दत असली तरी त्यामुळे देशात कोणाचाही मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही असा दावा केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केला. महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीचा इव्हेंट साजऱ्या करणाऱ्या मोदी सरकारवर मैला वाहण्याच्या प्रथेबाबत ही कबुली देण्याची वेळ येणे यातच सारे काही आल्याचे जाणकार मानतात. 

गांधीजींपासून अनेक समाजसुधारकांनी जीवतोड प्रयत्न केले तरी डोक्‍यावरून मैला वाहण्याच्या घृणास्पद प्रथेला भारतात मूठमाती मिळालेलीच नाही हेच पुरी यांच्या निवेदनातून स्पष्ट झाले. भाजपचे प्रभात झा यांच्या खासगी घटनादुरूस्ती विधेयकावर झालेल्या चर्चेत हस्तक्षेप करताना पुरी यांनी वरील कबुली दिली. मैला व भूमीगत गटारे साफ करण्याच्या कामात आधुनिक उपकरणांचा जास्तीत जास्त उपयोग करा अशा सूचना केंद्राने साऱ्या राज्य सरकारांना पत्र लिहून केल्याचे सांगून पुरी म्हणाले की पारंपारिकरीत्या या कामात जोडलेल्या बांधवांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षण व आधुनिक उपकरणे पुरवण्यासाठी केंद्राने विशेष प्रयत्न चालविले आहेत. 

दरम्यान एखादे राज्य वगळता उर्वरीत सारा ग्रामीण भारत हागणदारीमुक्त झाला आहे, असाही दावा पुरी यांनी केला. ग्रामीण भागात 10 कोटी शौचालये बांधली गेली आहेत व ग्रामीण भागातील स्वच्छतेचे प्रमाण 39 टक्‍क्‍यांवरून 100 टक्‍क्‍यांवर गेल्याचे केंद्राचे पाहणी सर्वेक्षण सांगते. यात जो भाग राहिला आहे तोही यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत हगणदारीमुक्त होईल. त्यानंतर एका त्रयस्थ संस्थेतर्फे याची पाहणी करून नंतरच याची घोषणा केली जाईल. पुरी म्हणाले की शहरांमध्ये जी 58 हजार सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत त्यांची माहिती गुगल मॅपद्वारेही मिळविता येते. शहरी भागात 67 लाख घरांत नव्याने शौचालये बांधण्यात आलेली आहेत. पुरी म्हणाले की तीन लाख सामुदायीक शौचालयांखेरीज अनेक राज्यांत फिरत्या शौचायलांचाही प्रयोग यशस्वीपणे राबविला जात आहे. 

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही ! 
दिल्ली विधानसेबच्या निवडणुका तोंडावर आल्या असून राजधानी विधानसभेत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची जादू कायम असल्याचे दिसते. मोफत वीज-पाणी, शिक्षणासाठी कर्ज व मोफत उच्चशिक्षण प्रशिक्षण, महिला सुरक्षेसाठी साऱ्या रस्त्यांवर कॅमेरे, महिलांना मोफत बसप्रवास, मोफत इंटरनेट या घोषणांचा धडाका केजरीवालांनी लावला. नेत्यांमधील लाथाळ्यांनी ग्रासलेला दिल्ली भाजप केजरीवालांसमोर धापा टाकत असल्याचे स्पष्ट दिसते. यावर मोदी सरकारने 1765 बेकायदा वसाहती कायदेशीर करण्याचा पत्ता फेकला आहे. हा कायदा पुरी यांच्याच मंत्रालयाने आणल्याने भाजप सत्तेवर आल्यास तेच दिल्लीचे भावी मुख्यमंत्री असतील अशी चर्चा आहे. स्वतः पुरी यांनी मात्र, आपण जन्मापासून दिल्लीकरच असलो तरी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बनण्याचा आपला काहीही इरादा नाही असे नुकतेच स्पष्ट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com