मोदींनी दिले शास्त्री - लोहियांचे दाखले, अर्थव्यवस्थेवर चर्चेचे आव्हान

दरम्यान राष्ट्रपती अभिभाषणाच्या आभारदर्शक ठरावावर मोदींचे उत्तर झाल्यावर राज्यसभेत हा ठराव एकमताने मंजूर करम्यात आला. मोदींनी खोटे बोलून देशाची पुन्हा दिशाभूल केल्याचा आरोप करत कॉंग्रेससह विरोधी पक्षीयांनी सभात्याग केला. दुसरीकडे जागतिक आर्थिक मंदीचाही सर्वाधिक लाभ भारतच घेऊ शकतो त्यासाठी सूचना द्या, असे आवाहन मोदींनी विरोधकांना केले.
 मोदींनी दिले शास्त्री - लोहियांचे दाखले, अर्थव्यवस्थेवर चर्चेचे आव्हान

नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून (सीएए) खुलाशामागून खुलासे करण्याचा सिलसिला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेतही चालू ठेवताना, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व समाजवाद्यांचे परमश्रध्देय राममनोहर लोहिया यांनीही, पाकमधील अल्पसंख्यांक शरणार्थींना भारतात आश्रय द्यायलाच हवा, असे स्पष्ट केल्याच्या उद्‌गाराचे दाखले देताच कॉंग्रेससह विरोधी बाकांवर काही क्षण शांतता पसरली. मात्र लगेचच पंतप्रधानांनी, खोटे बोलून तुम्ही देशाची दिशाभूल करता ? असा तिखट सवाल करताच कॉंग्रेस सदस्य खवळले. काका हाथरसींच्या डफली कवितेपासून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यापर्यंतच्या कविता ऐकवून मोदींनी विरोधकांवर हल्ले चढविले. 

दरम्यान राष्ट्रपती अभिभाषणाच्या आभारदर्शक ठरावावर मोदींचे उत्तर झाल्यावर राज्यसभेत हा ठराव एकमताने मंजूर करम्यात आला. मोदींनी खोटे बोलून देशाची पुन्हा दिशाभूल केल्याचा आरोप करत कॉंग्रेससह विरोधी पक्षीयांनी सभात्याग केला. दुसरीकडे जागतिक आर्थिक मंदीचाही सर्वाधिक लाभ भारतच घेऊ शकतो त्यासाठी सूचना द्या, असे आवाहन मोदींनी विरोधकांना केले. सीएए मुसलमानांच्या विरोधात नाही, याबाबत स्वतः मोदी व अमित शहा वारंवार स्पष्टीकरणे देत असूनही याबाबतची भिती व दहशत कमी होण्याचे नाव घेत नसल्याने प्रचंड अस्वस्थ असलेल्या पंतप्रधानांनी आज दिल्ली मतदानापूर्वी विरोधकांवर धारदार हल्ला करण्यासाठी संसदीय व्यासपीठच निवडल्याचे राजकीय जाणकार मानतात. कारण त्यांच्या सीएएवरील खुलाशानंतरही विरोधकांनी हा कायदा अल्पसंख्यांकांच्या विरोधात असल्याचेच एकमुखी मतप्रदर्शन केले. 

राज्यघटनेच्या नावाखाली सीएए विरोधी आंदोलनांत प्रदर्शनांच्या नावाखाली जो हिंसाचार झाला, जी अराजकता माजविली गेली त्यालाच लोकशाहीतील आंदोलनांचा अधिकार मानले गेले असे सांगून मोदी म्हणाले की कॉंग्रेसची मतपेढीची अगतिकता मी समजू शकतो पण डाव्या पक्षांचे काय ? त्यांनी तर, केरळमधील सीएए विरोधी प्रदर्शनात देशाच्या विभाजनवादी शक्ती सामील असल्याचे विधानसभेत मान्य केले ते देशाच्या इतर भागांतील याच प्रदर्शनांचे समर्थन करतात हा दुतोंडीपणा कशाला करता ? 
तुम्ही 24 तास अल्पसंख्यांकांच्या नावाने गळे काढता पण भूतकाळातील घोडचुकांमुळे शेजारी देशांत जे अल्पसंख्यांक बनले त्यांचे दुःख तुम्हाला दिसतच नाही का, अशी भावना व्यक्त करून मोदी कॉंग्रेसला म्हणाले की खुद्द तुमच्याच सरकारांनी याच संसदेत एनपीआर मंजूर केले व माझ्या सरकारने त्याच याद्यांचा आधार घेऊन उज्वला, जन धन आदी योजनांत गरीबांपर्यंत सरकारी योजना पोहोचविल्या हे तुम्हाला दिसत नाही. त्या एनपीआर विधेयकावेळी जे सायलेंट होते ते आज त्याच मुद्यावर व्हॉयलंट झाले आहेत, असे सांगून मोदी सभापती वेंकय्या नायडूंकडे पहात म्हणाले की, हा यांचा परिणाम, त्यावेळी कॉंग्रेससह विरोधकांनाही हसू आवरले नाही. 

उधृत केलेले शास्त्रीजींचे विधान (3 एप्रिल 1964) ः पूर्व पाकिस्तानातून जेवढे गैर मुस्लिम आहेत त्या साऱ्यांना देशाबाहेर हाकलले गेले. तो एक इस्लामी देश आहे व तो असा विचार करतो की येथे केवळ इस्लामला मानणारेच राहू शकतात. गैर इस्लामी येथे राहू शकत नाहीत. परिणामी हिंदू व इतर धर्मींयांना तेथून बाहेर काढले गेले. माझ्या माहितीनुसार 37 हजाराहून जास्त ख्रिश्‍चन व बुधअदधर्मीयही तेथून भारतात येत आहेत. शास्त्रीजीनी हे सांगितले तेव्हा पंडित नेहरू पंतप्रधान होते. 
लोहियांचे विधान ः हिंदुस्तानचा मुसलमानही जगावा व पाकिस्तानातील हिंदूही जगावा. ही गोष्ट मी फेटाळून लावतो की पाकिस्तानातील हिंदू पाक नागरिक आहेत म्हणून आम्ही त्यांची काही पर्वाच करू नये. पाकिस्तानचे हिंदू कोणतेही नागरिक असोत, त्यांचे रक्षण करणे हे भारतातील हिंदूंचे रक्षण करण्याइतकेच आमचे कर्तव्य आहे. आमचे समाजवादी साथी आम्हाला मानोत ना मानोत, पण ते लोहियांना कसे नाकारू शकतात ? असे पंतप्रधानांनी विचारले. 
माझ्या आक्षेपांवर उपाय शोधले... 
अर्थव्यवस्थेच्या मंदीवर पंतप्रधान गप्प असल्याचा आरोप खोडून काढताना मोदीनी, संपूर्ण अधिवेशनात अर्थव्यवस्थेच्या वर्तमान स्थितीवर चर्चा होऊ द्या, असे मी अधिवेशनाआधी सर्वपक्षीय बैठकीतच म्हटले होते पण तुम्हाला निराशेचेच वातावरण तयार करायचे असल्याने ती चर्चाही तुम्हाला नको आहे असा प्रतिहल्ला चढविला. यावेळी त्यांनी विविध योजनांचा लाभ मिळालेल्यांची आकडेवारीही सांगितली. जीएसटीच्या ज्या मुद्यांना मी मुख्यमंत्री म्हणून तीव्र विरोध केला होता त्यांचे उपाय शोधल्यावरच तत्कालीन अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जीएसटीला अंतिम रूप दिले असाही त्यांनी दावा केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com