राज्यसभेने बॅलन्स (समतोल) व ब्लॉकिंग (ठप्प पाडणे) याचा समतोल राखावा - नरेंद्र मोदी

राज्यसभेने बॅलन्स (समतोल) व ब्लॉकिंग (ठप्प पाडणे) याचा समतोल राखावा - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस व बीजेडी या दोन्ही पक्षांनी वेलमध्ये उतरून गोंधळ न घालण्याची शिस्त स्वतःला घालून घेतली आहे व ती कसोशीने पाळतानाही त्यांच्या विकासयात्रेत कोठेही अडथळा आलेला नाही अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रवादीचे गोडवे गायले. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचे अडलेले घोडे मोकळे होण्याचे नाव घेत नसताना मोदींनी शरद पवार यांच्यासमोरच चक्क राष्ट्रवादीच्या आदर्श आचरणाचा दाखला देताना भाजपनेही राष्ट्रवादीकडून ही शिस्त शिकावी असे सांगितले अन्‌ राजकीय राजधानी असलेल्या दिल्लीत क्षणार्धात ती हेडलाईन झाली. 

आपल्या अधिवेशनांचे अडीच शतक साजरे करणाऱया राज्यसभेला दुय्यम मानण्याची चूक जशी कोणी करू नये तसेच या सभागृहानेही संसदीय कामकाज व देशविकासात पूरक भूमिका करावी असाही सल्ला मोदींनी दिला. राज्यसभा सेकंडरी वा महत्वहीन सदन नाही असे ते म्हणाले. संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. मोदींनी पहिल्या दिवशी राज्यसभेला संबोधित करताना आपल्या राजवटीत वेलमध्ये उतरून गोंधळ न घातल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बिजू जनता दल यांचे तोंडभरून कौतुक केले. या दोन्ही पक्षांचे खासदार कधीच वेलमध्ये उतरत नाहीत. सभागृहात अडथळे निर्माण करण्यापेक्षा आपण संवादाचा मार्ग अवलंबला पाहिजे, हा धडा या दोन्ही पक्षांकडून सर्वांनी धडा घ्यायला हवा, भाजपनेही घ्यायला हवा असेही मोदी म्हणाले. या दोन्ही पक्षांचे आभार मानायला हवेत. जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो, तेव्हाही हे दोन्ही पक्ष काम करत होते. मात्र, या दोन पक्षांनी या बाबतीत एक चांगला आदर्श घालून दिला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. 

गेली पाच वर्षे अल्पमतातील भाजपचे नाक राज्यसभेत वारंवार दाबण्यात आले याचा सल आपण कधी विसरणार नाही असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. आपला मुद्दा सप्षट करताना ते म्हणाले राज्यसभेने बॅलन्स (समतोल) व ब्लॉकिंग (ठप्प पाडणे) याचा समतोल राखला पहिजे असे नमूद केले. संसदेचे हे वरिष्ठ सभागृह देशाच्या संघराज्य रचनेचा आत्मा आहे, असे ते म्हणाले. ते दुय्यम नाही व तसे करण्याची चूक कोणीही करू नये याची त्यांनी आठवण करून दिली. 

मोदींनी राज्यसभेचे पहिले सभापती गोपालस्वामी अय्यंगार ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत अनेकांची वचने उधृत केली. जम्मू- काश्‍मीर साठीचे तात्पुरते कलम 370 अय्यंगार यांनी याच सभागृहात सादर केले होते व याच सभागृहाने ते अलीकडे रद्दही केले हा योगायोग त्यांनी लक्षात आणून दिला. राज्यसभा काळानुसार स्वतःला जुळवून घेत आहे. काळ बदलला व या सभागृहाने बदलत्या परिस्थितीला आत्मसात करून स्वतःला जुळवून घेतले असे सांगून मोदी म्हणाले की या सभागृहात गरिबांना 10 टक्के आरक्षण, जीएसटीसारखा ऐतिहासिक कायदा, तीनदा तलाक बंदी, 370 कलम असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महिला सक्षमीकरण येथेच झाल्याचे पहायला मिळत आहे. हे सभागृह भारताच्या विकासाचे प्रतिबिंब आहे. कल्याणकारी राज्य व राज्यांचे कल्याण या दोन्ही बाबतीत राज्यसभेने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. केंद्र व राज्यांतील सरकारे प्रतिस्पर्धी नव्हेत हे या सभागृहाने वारंवार सिद्ध केल्याचेही मोदींनी सांगितले. 

कॉंग्रेसवर शरसंधान... 
लोकसभा जमिनीशी जोडलेली असते तर राज्यसभेला दूरदृष्टी असते असे सूचकपणे सांगणाऱया मोदींनी कॉंग्रेसला टोमणे मारण्याची संधी वारंवार साधली. ते म्हणाले की घटनाकार डॉ. आंबेडकर यांना लोकसभेत पोहोचू दिले गेले नाही तेव्हा याच राज्यसभेने त्यांच्या विद्वत्तेचा, अनुभवाचा लाभ देशाला मिळवून दिला. कलम 370 एका वर्षात रद्द करू असे या सभागृहात 1964 मध्ये सागितले गेले होते, असा टोला त्यांनी कॉंग्रेसला लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com