जनतेने नाकारलेल्या टोळीच्या हाती फक्त खोटारडेपणा हेच शस्त्र : मोदी

गेले अनेक दिवस देशात (सीएए जागृतीसाठी) आमच्या नेत्याचे रोज 10 ते 15 कार्यक्रम होत आहेत व प्रत्येक कार्यक्रमात 50 हजार ते 1 लाखांची गर्दी असते. पण आम्हाला ते (टीव्हीवर) दिसणारच नाही. याची सवय आम्हाला आहे कारण जनतेच्या आशीर्वादाने व विश्‍वासानेच आम्ही भाजप कार्यकर्ते पुढेपुढे जात राहिलेले आहोत. लोकाशीँ संवाद व संपर्क हीच आमची ताकद आहे त्यामुळेच इतके सत्य पसरवूनही हे लोक आम्हाला हलवू शकलेले नाहीत असेही मोदींनी सांगितले.
जनतेने नाकारलेल्या टोळीच्या हाती फक्त खोटारडेपणा हेच शस्त्र : मोदी

नवी दिल्ली : ज्यांना निवडणुकीत जनतेने नाकारले तेच आता खोटे पसरवण्याच्या शस्त्राने कारस्थाने करत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएए कायद्याला होणाऱ्या तीव्र विरोधाच्या संदर्भात विरोधी पक्षांवर आज हल्लाबोल केला. भाजपचे नवे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सत्कार कार्यक्रमावेळी भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात मोदींनी विरोधकांसह प्रसारमाध्यमांवरही अक्षरशः आगपाखड केली. या दोन्हींना उद्देशून मोदींनी टोळी असा शब्दप्रयोग केला. 

वादग्रस्त नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधातील देशव्यापी तीव्र आंदोलने थांबण्याचे नाव घेत नसल्याने मोदी सरकारमध्ये चांगलीच अस्वस्थता आहे. "सीएए' विरोधी आंदोलनांमागे कॉंग्रेससह विरोधक असल्याचा पक्का समज सरकारच्या नेतृत्वाने करून घेतला आहे. त्यातूनच मोदींच्या संतापाचा पुन्हा उद्रेक झाल्याचे मानले जाते. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप आपल्या विचारसरणीसह अग्रेसर होणार याचा मला पूर्ण विश्‍वास आहे पण येणाऱ्या काळात विरोधी पक्षांपेक्षाही मोठ्या आव्हानांचा सामना भाजपसारख्या पक्षाला करावा लागेल असा इशाराही त्यांनी नवनियुक्त अध्यक्ष नड्डा यांना दिला. 

नड्डा यांची पक्षाध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती झाल्यावर संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासह लालकृष्ण अडवानी, डॉ. मुरली मनोहर जोशी, राजनाथसिंह व नितीन गडकरी या माजी अध्यक्षांसह सर्वश्री राधामोहनसिंह, माजी गृहमंत्री हंसराज अहीर, माजी संघटनमंत्री रामलाल, बी एल संतोष, विजया रहाटकर, पियूष गोयल आदी उपस्थित होते. 

सीएएच्या विरोधातील आंदोलनांची देशव्यापी व्याप्ती दिवसेंदिवस वाढत जात आहे. अनेक राज्यांत महिला व तरूण उस्फूर्तपणे या कायद्याच्या विरोधात उतरले आहेत. सीएएच्या विरोधातील आंदोलनांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधींची छायाचित्रे व राष्ट्रध्वजासह जन गण मनचे गायन केले जाते. त्यामुळे या आंदोलनांवर राष्ट्रविरोधी शिक्का मारणेही भाजपला अशक्‍य बनले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून शहा यांच्यासह भाजपचे सारे मंत्रीही मोठमोठे कार्यक्रम व जाहीर सभा घेऊन सीएए कसा सकारात्मक आहे याबाबत सांगत आहेत. मात्र याचा मोदींना अपेक्षित तेवढा परिणाम दिसत नसल्यानेच त्यांची चिडचीड आज पुन्हा बाहेर आल्याचे मानले जाते. 

भाजप ज्या आदर्शांवर चालला आहे त्याबद्दलच काहीना आक्षेप आहे असे सांगून मोदी म्हणाले ज्यांना जनतेनेच नाकारले व ज्यांना देश आता स्वीकारायला तयार नाही त्यांच्या हाती आता एकच शस्त्र उरले आहे. ते म्हणजे प्रत्येक गोष्टीबाबत खोटे, असत्य, भ्रम यांचा फैलाव करणे व आपल्या इकोसिस्टीमच्या मदतीने ती पोहोचविणे. अशा या काळात आम्हाला प्रसारमाध्यमांकडून मदत मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. त्याची आम्हाला सवय नाही आणि आमचीही त्यांच्याकडून अपेक्षाच नाही. ही टोळी कधीच आमच्याबरोबर नव्हती त्यामुळे त्यांच्याकडून मदतीसाठी भाजपने वेळ वाया घालवूच नये. 

गेले अनेक दिवस देशात (सीएए जागृतीसाठी) आमच्या नेत्याचे रोज 10 ते 15 कार्यक्रम होत आहेत व प्रत्येक कार्यक्रमात 50 हजार ते 1 लाखांची गर्दी असते. पण आम्हाला ते (टीव्हीवर) दिसणारच नाही. याची सवय आम्हाला आहे कारण जनतेच्या आशीर्वादाने व विश्‍वासानेच आम्ही भाजप कार्यकर्ते पुढेपुढे जात राहिलेले आहोत. लोकाशीँ संवाद व संपर्क हीच आमची ताकद आहे त्यामुळेच इतके सत्य पसरवूनही हे लोक आम्हाला हलवू शकलेले नाहीत असेही मोदींनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com