प्रक्षोभक जमावाने खेड पोलिस ठाण्याची पोलिस गाडी पेटविली...डीवायएसपी, निरीक्षकांसह पोलिसांना मारहाण

पोलिसांच्या आततायीपणामुळे जमाव चिडला...
प्रक्षोभक जमावाने खेड पोलिस ठाण्याची पोलिस गाडी पेटविली...डीवायएसपी, निरीक्षकांसह पोलिसांना मारहाण

खेड (रत्नागिरी) : गुरांच्या हत्या होत असल्याच्या संशयावरून संतापलेल्या पीरलोटे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शनिवारी (ता.26) मुंबई-गोवा महामार्ग पाच तास रोखून धरला. तहसीलदारांशी चर्चा करणाऱ्या जमावांवर पोलिसांनी मागून येत लाठीचार्ज केल्याने जमाव संतापला.

पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. एक पोलिस गाडी जाळण्यात आली, तर पोलिस व तहसीलदारांच्या अशा दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीत डीवायएसपी, पोलिस निरीक्षकांसह चार पोलिस जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. पाचशे ते आठशे लोकांचा जमाव तहसीलदारांसमोर बोलत असताना जमावाला पाठीमागून आलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी विश्‍वेश्‍वर नांदेडकर यांनी तुम्ही रस्त्यावरील अनेक लोकांना वेठीस धरत आहात, असे म्हणत लाठीचार्ज केला. त्यामुळे जमाव पुन्हा प्रक्षोभक झाल्याची माहिती धामणदिवीचे उपसरंपच सचिन देवळेकर यांनी दिली.

लाठीचार्ज सुरू झाल्याने जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. नांदेडकर व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यावर दगडाचा मारा झाला. पोलिस गाडी पेटवून दिली. दुसरी गाडी फोडली. तहसीलादारांची गाडीही फोडली. तहसीलदार कदम यांना नजीकच्या घरात लपवले. त्यानंतर त्यांना खासगी वाहनाने खेडला सोडण्यात आले. स्थानिक पोलिस कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेले. काही ग्रामस्थ व पोलिस कर्मचाऱ्यांनी नांदेडकर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरडा रुग्णालयात दाखल केले.

 
पहाटे संशयास्पद मोटारीचा पाठलाग केल्यानंतर ती मोटार कुठून कुठे गेली याची माहिती तसेच मोटारीत बसलेल्या हत्यारबंद संशयिताचे वर्णन सांगूनही पोलिस शिथिल असल्याचे ध्यानात आल्यावर त्यांनी महामार्गावर ठिय्या दिला. महामार्गावर सकाळपासूनच टायर जाळून पोलिस प्रशासन हाय..हाय.. या पोलिसाचे करायचे काय, अशी घोषणाबाजी सुरू केली. लोटेतील पोलिस अधिकारी बाबूराव धालवलकर, विवेक साळवी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण केले. पोलिस निरीक्षक अनिल गंभीर पथकासह घटनास्थळी दाखल झाले. परंतु जमाव शांत न झाल्याने तहसीलदारांना बोलावण्यात आले. तहसीलदार अमोल कदम तेथे पोहोचले. दोन दिवसात संशयित आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करू, असा शब्द दिला. मात्र त्याचवेळी पोलिसांच्या अरेरावीमुळे पुढचा राडा घडला, असे ग्रामस्थांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com