युवानेते अमित ठाकरेंसोबत सेल्फीसाठी औरंगाबादेत कार्यकर्त्यांची गर्दी  - MNS youth workers were eager to take a selfie with Aditya Thakre | Politics Marathi News - Sarkarnama

युवानेते अमित ठाकरेंसोबत सेल्फीसाठी औरंगाबादेत कार्यकर्त्यांची गर्दी 

जगदीश पानसरे
गुरुवार, 19 जुलै 2018

अमित ठाकरे यांची मराठवाड्यात युवक कार्यकर्त्यात क्रेझ  असून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी युवा कार्यकर्ते गर्दी करीत आहेत . 

औरंगाबाद :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे  पुत्र अमित ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातून अमित यांचे राजकारणातील 'ग्रूमिंग' सुरु झाले आहे . अमित ठाकरे यांची मराठवाड्यात युवक कार्यकर्त्यात क्रेझ  असून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी युवा कार्यकर्ते गर्दी करीत आहेत . 

सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे, मुबंईतील मनसेच्या शाखांना भेटी देऊन कार्यकर्त्यांमध्ये रमणारे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे औरंगाबादेत येणार हे कळल्यावर   मनसे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले . काल विमानतळावर आगमन झाल्यानंतरही त्यांनी कार्यकर्त्यांसोबत सेल्फी काढत आपल्या साधेपणाचा परिचय दिला होता. 

साडेतीन वर्षांनी मराठवाड्यात येणाऱ्या राज ठाकरे यांच्या सोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरेही येणार असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. शहरभर लावलेल्या स्वागतपर बॅनरवर देखील राज यांच्या सोबतच अमित ठाकरे यांची छायाचित्र झळकली आहेत . मनसेच्या युवा कार्यकर्त्यात अमित ठाकरे यांची क्रेझ आहे . 

मुंबई, पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना जरी अमित ठाकरे यांचा परिचय असला तरी मराठवाडा व औरंगाबादच्या कार्यकर्त्यांमध्ये ते कसे बोलतात, वागतात याबद्दल प्रचंड कुतुहूल निर्माण झाले आहे. आज सकाळी सुभेदारी विश्रामगृहावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा देखील कार्यकर्त्यांच्या नजरा अमित ठाकरे यांना शोधत होत्या, पण ते आले नव्हते. पत्रकार परिषद संपल्यानंतर अमित आपल्या मित्रांसोबत हॉटेलमधून सुभेदारीत आले. 
 
गाडीतून उतरल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घालत त्यांच्यासोबत सेल्फी काढले . त्यानंतर ते थेट राज ठाकरे थांबलेल्या खोलीत गेले. तिथे पदाधिकाऱ्यांशी सुरू असलेल्या चर्चेत सहभागी झाले. ही चर्चा संपल्यानंतर राज ठाकरेंचा ताफा तापडीया नाट्यमंदीरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याकडे निघाला. पण अमित ठाकरे यांची गाडी मात्र मेळाव्याकडे न येता परत रामा इंटरनॅशनलकडे वळवण्यात आली. 

पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे व्यासपीठावर आले तेव्हाही अनेक तरूण कार्यकर्त्यांच्या नजरा अमित ठाकरे यांच्या आगमनाकडे लागल्या होत्या. पण ते आले नाहीत कळाल्यावर कार्यकर्ते राज ठाकरेंचे भाषण ऐकण्यात दंग झाले. 

क्रिकेटचा डाव रंगला 
दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी अमित ठाकरे आपले वडील राज यांच्या सोबत पत्रकार परिषद आणि पदाधिकारी  मेळाव्यात व्यासपीठावर आले नाहीत .  अमित ठाकरे यांनी औरंगाबाच्या राजकीय खेळपट्टीचा फील घेताना चक्क   रामा इंटरनॅशनलच्या हिरवळीवर  आपल्या मित्रांसोबत क्रिकेटचा डाव मांडत जोरदार बॅटिंग केली. 

यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांपैकी  दोन पोलिसांनीही त्यांच्याबरोबर सेल्फी काढून घेतला . 

पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा संपल्यानंतर राज ठाकरे यांचा ताफा थेट रामा हॉटेलमध्ये आला. अमित ठाकरे व त्यांचे मुंबईहून आलेले ५-७ मित्र आधीपासूनच हॉटेलमध्ये थांबलेले होते. दुपारी थोडी विश्रांती घेतल्यानंतर अमित ठाकरे व त्यांच्या मित्रांनी रामा इंटरनॅशनलच्या हिरवळीवरच क्रिकेटचा डाव मांडला. तासभर क्रिकेट खेळून दमलेले अमित चांगलेच घामेजले  झाले होते. 

राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना त्यामुळे अमित ठाकरे यांची राजकीय फिल्डवरील बॅटिंग मनसे कार्यकर्त्यांना अद्याप पहायला मिळाली नसली तरी रामाच्या हिरवळीवर मात्र त्यांनी जोरदार बॅटींग केल्याचे दिसून आले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख