भाजपमध्ये प्रवेश करूनही बाबा जाधवराव मनसेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत

भाजपमध्ये प्रवेश करूनही बाबा जाधवराव मनसेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ही मनसेची मुलुख मैदानी तोफ. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार नसताना त्यांनी प्रचार सभा गाजवल्या. आता विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी राज यांच्यासमवेत 19 जण स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात इतर स्टार प्रचारकांमध्ये बाळा नांदगावकर, दीपक पायगुडे, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, संजय चित्रे, जयप्रकाश बाविस्कर, अनिल शिदोरे, प्रमोद पाटील, अभिजीत पानसे, मनोज चव्हाण, आदित्य शिरोडकर, परशुराम उपरकर, हेमंत गडकरी, बाबा जाधवराव, राजा चौगुले, संदीप देशपांडे, रिटा गुप्ता यांचा समावेश आहे.

या यादीत बाबा जाधवराव यांच्या नावाचा मात्र गोंधळ झाला आहे. जाधवराव हे मनसेच्या शेतकरी आघाडीचे प्रमुख होते. त्यांनी गेल्या आठवड्यातच चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांचा समावेश आजही मनसेने स्टार प्रचारकांच्या यादीत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

मनसेच्या वतीने पुणे शहरात पाच आणि जिल्ह्यात दोन असे एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात कसबापेठ मतदारसंघातून अजय शिंदे, शिवाजीनगर येथून सुहास निम्हण, कोथरूडमधून किशोर शिंदे, हडपसरमधून वसंत मोरे, पुणे कॅन्टोन्मेंटमधून मनीषा सरोदे निवडणूक लढवीत आहेत. तर, ग्रामीणमध्ये शिरूर मतदारसंघातून कैलास नरके आणि भोरमधून अनिल मातेरे निवडणूक लढवीत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्यासह शालिनी ठाकरे, पायगुडे, शिदोरे यांच्यासह इतर नेते सभा घेणार आहेत.

सभेसाठी मैदानाचा शोध
राज ठाकरे यांची पुण्यातील सभा पावसामुळे रद्द झाली. ही सभा पुन्हा सोमवारी (ता. 14) घेण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. मंडई येथे सभा घेण्यासाठी महापालिका आणि वाहतूक विभागाकडे परवानगी मागितली आहे. परंतु अद्याप ती मिळालेली नाही, असे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com