मनसेचा फेसबुक लाईव्हचा दणका, काही तासांत रस्ता झाला चकाचक!

नाशिक रोड भागातील वर्दळीचा अस्वच्छ रस्ता वारंवार पाठपुरावा करुनही स्वच्छ होत नव्हता. 'मनसे'चे रोहन देशपांडे यांनी या रस्त्याचे थेट फेसबुक लाईव्ह केल्याने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अवघ्या काही तासांत तो रस्ता चकाचक केला
Nashik Corporation Cleared Garbage After MNS Facebook Live
Nashik Corporation Cleared Garbage After MNS Facebook Live

नाशिक : आजच्या सोशल मिडीयाच्या युगात राजकारणातही युवा पिढीकडून 'आऊट ऑफ बॉक्‍स' विचारसरणी प्रचलीत झाली आहे. 'मनसे'ची आंदोलने त्यासाठी नेहेमीच चर्चेत असतात. नाशिक रोड भागातील वर्दळीचा अस्वच्छ रस्ता वारंवार पाठपुरावा करुनही स्वच्छ होत नव्हता. 'मनसे'चे रोहन देशपांडे यांनी या रस्त्याचे थेट फेसबुक लाईव्ह केल्याने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अवघ्या काही तासांत तो रस्ता चकाचक केला.

येथील शाहूनगरमधील ताराराणी सभागृहाजवळ रस्त्याच्या सुरुवातीला कचऱ्याचा ढीग पसरला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा कार्यकर्ते रोहन देशपांडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे या समस्येला वाचा फोडली. परिणामी समाजमाध्यमाच्या ताकदीमुळे त्वरित स्वच्छता होऊन परिसराने मोकळा श्वास घेतला. रस्ता चकाचक झाला. या परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. परंतु नेहमीच कचऱ्याचा ढिग असल्याने नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत धरून वावरावे लागत होते. 

महापालिकेला स्वच्छ शहर सर्वेक्षणात नुकताच चौथा क्रमांक मिळाला. त्याबद्दल पाठही थोपटून घेण्यात आली. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. प्रत्यक्षात शहरातील विविध भागात ठिकठिकाणी रस्त्यांवर कचरा साठलेला असतो. मोकाट गुरे तेथील कचरा सर्वत्र पसरवतात. दुर्गंधी पसरते. साथीचे रोग पसरण्याची भीती असते. मनपाच्या स्वच्छता विभागाचे मात्र याकडे सोईस्कर दुर्लक्ष होते.

काल नाशिकरोडच्या ताराराणी सभागृहाजवळ कचऱ्याचे ढीग साठल्याचे निदर्शनाला आले. परिसरातील महाराष्ट्र सैनिक रोहन देशपांडे यांनी सहकाऱ्यांसह तेथे धाव घेतली. अक्षरशः कचराकुंडी झालेल्या रस्त्याचा व्हिडीओ करून फेसबुक लाईव्हद्वारे शेअर केला. त्यात त्यांनी महापालिका आयुक्तांना तासात या प्रकाराची दखल घेण्याचे आवाहन केले. नागरिक कर भरतात तो अधिकाऱ्यांच्या भरभक्कम पगारासाठी नव्हे तर महापालिकेने योग्य सेवासुविधा नियमितपणे पुरवाव्या यासाठीच. 

मात्र प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष असते. त्वरित स्वच्छता झाली नाही तर आयुक्त कार्यालयात येऊन कचरा भेट दिला जाईल असा इशाराही देशपांडे यांनी दिला. या व्हिडीओमुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. त्वरित चक्रे फिरली. नाशिकरोड विभाग स्वच्छता निरीक्षक विजय मोरे यांनी घटनास्थळी दाखल होत कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर साफसफाई करून घेतली. या तत्परबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रोहन देशपांडे यांनी महापालिकेचे व संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com