स्थानिकांच्या बेशिस्तीने मनसे-भाजप युतीचा पॅटर्न नाशिकमध्ये हुकला

प्रभाग २२ व २६ (अ) मधून राजीनामा दिलेल्या नगरसेवकांच्या जागी नुकतीच पोटनिवडणूक झाली. त्यात महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर पराभवामागची कारणमीमांसा समोर येत आहे
Bjp-MNS Alliance Pattern Failed in Nashik
Bjp-MNS Alliance Pattern Failed in Nashik

नाशिक : शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षांची राज्यात महाविकास आघाडी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला शह देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जवळीक साधली. त्यातून मनसे व भाजप असा नवा पॅटर्न उदयाला येण्याचे संकेत मिळाला. हा प्रयोग करण्याचा निर्णय भाजपकडून झाला. परंतु, नेत्यांच्या सुचना असूनही भाजप उमेदवाराने माघार न घेतल्याने मनसे-भाजप युतीचा पॅटर्न फसला. ही खंत भाजपचे स्थानिक नेते व्यक्त करत आहेत. यामुळे मनसेचे वरिष्ठही चांगलेच नाराज झाले आहे.

प्रभाग २२ व २६ (अ) मधून राजीनामा दिलेल्या नगरसेवकांच्या जागी नुकतीच पोटनिवडणूक झाली. त्यात महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर पराभवामागची कारणमीमांसा समोर येत आहे. राज्यात महाविकास आघाडीचा उदय झाल्याने शिवसेनेला जवळ करून शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मनसेने भाजपचे विचार स्वीकारले, तर युती शक्‍य असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजप-मनसे युतीचा नवा पॅटर्न उदयाला येण्याचे संकेत मिळत होते.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपला साथ दिल्याने तेथील आर्थिक चाव्या भाजपच्या हाती आल्यानंतर सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हाच पॅटर्न अमलात आणण्याच्या सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्या. नाशिकमधील प्रभाग २६ (अ) च्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराने माघार घेऊन त्याऐवजी मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, उमेदवारी माघारीच्या दिवशी संबंधित उमेदवार गायब झाल्याने मनसे व भाजपला एकमेकांविरोधात लढावे लागले.

मनसेकडूनही विरोध

मनसे उमेदवाराच्या पराभवाला पक्षांतर्गत राजकारणही कारणीभूत ठरले आहे. मनसेला या पोटनिवडणुकीत यश मिळाले असते, तर दिलीप दातीर यांची ताकद वाढली असती. त्यामुळे महापालिकेत मोठ्या पदावर काम केलेल्या मनसेच्या एका नेत्याने भाजपकडून उमेदवार उभा करण्यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. असाच प्रयोग प्रभाग २२ मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाने फुस दिल्याने भाजपची बंडखोरी झाली. त्यात मतविभागणी होऊन मतदारांत योग्य संदेश गेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com