विधानसभा निवडणूकीत 'नोटा' चा वापर करा; डोंबिवलीत मनसेचा पडद्याआड प्रचार

वातावरण निर्मितीसोबतच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पडद्याआड सरकारविरोधात प्रचारही सुरु केला आहे. विधानसभा निवडणुक लढवायची की नाही याविषयीची भूमिका स्पष्ट नसल्याने या प्रचारात मतदारांना येत्या निवडणुकीत पक्ष विरहित विचार सरणीतुन सुशिक्षित उमेदवार निवडा अन्यथा आयोगाने दिलेल्या 'नोटा' हा पर्याय आहे हे लक्षात ठेवा असे सुचित करत युती विरोधात मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
MNS Appealing To Vote For NOTA in Dombivali
MNS Appealing To Vote For NOTA in Dombivali

ठाणे - लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी निवडणूक व लढवता मोदी सरकारच्या विरोधात  प्रचार सभा घेऊन हवा तयार केली होती. विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात असताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवलीत युती सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. वातावरण निर्मितीसोबतच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पडद्याआड सरकारविरोधात प्रचारही सुरु केला आहे. विधानसभा निवडणुक लढवायची की नाही याविषयीची भूमिका स्पष्ट नसल्याने या प्रचारात मतदारांना येत्या निवडणुकीत पक्ष विरहित विचार सरणीतुन सुशिक्षित उमेदवार निवडा अन्यथा आयोगाने दिलेल्या 'नोटा' हा पर्याय आहे हे लक्षात ठेवा असे सुचित करत युती विरोधात मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिवसेना व भाजपाकडून विकासकामांच्या भूमिपूजनांचा धुमधडाका सुरु आहे. सध्या कल्याण डोंबिवलीतील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. यंदाच्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून खड्ड्यांमुळे अपघात होऊन वाहनचालक जखमी झाले आहेत. रस्त्यांवरील खड्डे, पाऊस आणि विविध कामांमुळे होणारी वाहतूक कोंडीतून प्रवास म्हणजे रोजचेच मरण झाले आहे अशी प्रतिक्रीया नागरिक व्यक्त करीत आहेत. या सोबतच काही प्रभागात बाराही महिने असणारी पाण्याची समस्या, वीजेची समस्या, अस्वच्छतता यांसारख्या अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने नागरिकांच्या मनात असंतोष खदखदत आहे. 

याचाच फायदा विरोधी पक्षांनी घेण्याचे ठरविले असून त्यानुसार शहरात वातावरण निर्मिती करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. समस्यांनी नागरिक त्रासलेले असताना भाजप सरकारने कोट्यावधी रुपये विकास प्रकल्पासाठी खर्च केल्याची जाहीरातबाजी सुरु केली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने मोठागाव ठाकुर्ली येथील ३०० एकर जागेवर तीन हजार कोटी रुपये खर्चाचे विमानतळ उभारण्याचा प्रकल्पाचे भूमिपूजन करत विरोध दर्शविला. 'डोंबिवलीचे आमदार राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात घोटाळा व चौकशी सुरु नसलेला व पूर्ण झालेला प्रकल्प दाखविणाऱ्यास 501 रुपयांचे बक्षिस देऊ, साडेचार वर्षे मंत्री व आमदार असलेल्या चव्हाण यांनी डोंबिवलीच्या विकासासाठी काय केले हे दाखवावे. कोपर पूल सध्या वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. हे काम पूर्णत्वासाठी किती कालावधी लागणार हे त्यांना माहित नाही. हेच का गतिमान सरकार,' असे सांगत त्यांनी युती सरकारवर निशाणा साधलेला आहे. मानकोली रेतीबंदर पूल काम रखडले, ठाकुर्ली पूलाचे काम अर्धवट, पत्री पुलाचे काम रखडले आता कोपर पूल बंद ही कोणती गती अशी टीका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनातून व्यक्त केली.

युती सरकारची पोलखोल करतानाच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी समाज माध्यमाचा आधार घेत पडद्याआडचा प्रचारही सुरु केला आहे. या संदेशात मनसेने मतदारांना आवाहन केले आहे. डोंबिवली मतदारसंघात निवडून आलेल्या प्रत्येक भाजपा, सेनेच्या आमदार खासदारांवर टिका करण्यात आली आहे. यातही भाजपा सरकार व राज्यमंत्री रविंद्र चव्हाण विरोधी रोष जास्त दिसून येत आहे.

प्रचारार्थ फिरत असलेला संदेशात डोंबिवली विधानसभा मतदार संघात फार पूर्वी म्हणजे रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील यांच्यापासून ते आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत भाजपासोडून कोणताही पक्ष निवडून आलेला नाही. तसेच लोकसभेसाठी कायम युतीचे खासदार निवडून दिले आहे. पण हे युती असलेले पक्ष डोंबिवलीतील जनतेला गृहीत धरत शहराचा विकास करण्याऐवजी शहर भकास करीत आहेत. तरीही आपण डोळे मिटून त्यांना का निवडून देतो? असा सवाल करण्यात आला आहे. 

तसेच मतदारांना आवाहन करीत एकदा विचार करा व आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काय करत आहोत याचा विचार करुन येत्या निवडणुकीत पक्ष विरहीत विचार सरणीतून सुशिक्षित उमेदवार निवडावा अन्यथा आयोगाने दिलेल्या नोटा या पर्यायाचा विचार करावा असे सुचित करण्यात आले आहे. तसेच 'डोंबिवलीतील जनता सुज्ञ आहेच, पण बस झाले आता सहन करीत असुविधांमध्ये जगणे' अशी भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com