जाधव, दाशरथेंच्या मनसे प्रवेशाने इंजिन महापालिकेच्या यार्डात जाईल का ?

अर्थात या दोघांचे प्रवेश आगामी औरंगाबाद महापालिका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले आहेत. जाधव, दाशरथे यांच्या मनसे प्रवेशाने या पक्षाची महापालिकेत एन्ट्री होते का ? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कुस बदलली आणि प्रखर हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. केंद्र सरकारच्या एनआरसी, सीसीएला थेट पाठिंबा न देता पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलून द्या अशी मागणी करत मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला.
  जाधव, दाशरथेंच्या मनसे प्रवेशाने इंजिन महापालिकेच्या यार्डात जाईल का ?

औरंगाबाद : मनसेच्या मुंबईतील महामोर्चाच्या आधी औरंगाबादेतील शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख, माजी आमदार यांचा कृष्णकुंजवर पक्ष प्रवेश झाला. खरं तर हा प्रवेश औरंगाबादेतच एक मोठा सोहळा घेऊन करण्याचे नियोजन होते, पण राज ठाकरेंचा दौरा पुढे ढकलल्या गेल्याने तो मुंबईतच उरकण्यात आला. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला शिवस्वराज्य बहुजन पक्ष गुंडाळून ठेवल्यानंतर ते नव्या पर्यायाच्या शोधात होते. त्यांनी आपल्या जुन्या पक्षाची निवड करत मनसेत जाणे पसंत केले. तर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुहास दाशरथे यांनी शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याचा आरोप करत राज ठाकरेंच्या मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला. 

अर्थात या दोघांचे प्रवेश आगामी औरंगाबाद महापालिका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले आहेत. जाधव, दाशरथे यांच्या मनसे प्रवेशाने या पक्षाची महापालिकेत एन्ट्री होते का ? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कुस बदलली आणि प्रखर हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. केंद्र सरकारच्या एनआरसी, सीसीएला थेट पाठिंबा न देता पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलून द्या अशी मागणी करत मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला. मनसेच्या मुंबईतील पहिल्या राज्य अधिवेशनात राज ठाकरे यांनी ही घोषणा केली होती. त्यानंतर मनसेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढेल आणि अनेक पक्षातील मोठे चेहरे त्यात दिसतील अशी अपेक्षा होती. तुर्तास तरी ती फोल ठरली आहे. 

मनसेतून एकेकाळी बाहेर पडलेले प्रकाश महाजन, हर्षवर्धन जाधव आणि शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे यांनी पक्षप्रवेश केला. राज ठाकरे यांनी देखील लगबगीने या सगळ्यांना हिरवा झेंडा दाखवत पक्षात सामील करून घेतले. प्रकाश महाजन, हर्षवर्धन जाधव यांनी पूर्वी मनसेत काम केलेले असल्यामुळे राज ठाकरे त्यांना चांगले ओळखून आहेत. तर सुहास दाशरथे यांचा राज ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असतांना संपर्क आलेला आहे. 

या सगळ्या पक्षात प्रवेश देण्यामागे औरंगाबाद महापालिका निवडणुक हे एकमेव कारण सध्या तरी दिसते. प्रकाश महाजन हे दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचे बंधु आणि भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा आहेत. मनसेत असतांना त्यांनी पक्षाची भूमिका वेळोवेळी अत्यंत परखडपणे मांडल्याचे आपण पाहिले. प्रमोद महाजन यांचे बंधु असल्याने त्याच्यांकडे चांगले वक्तृत्व आहे. त्यांच्या या गुणाचा फायदा मनसेला महापालिका निवडणुकीत होऊ शकतो. 

जाधव पुनरागमन करणार.. 
हर्षवर्धन जाधव हे एक वादग्रस्त तितकेच चर्चित व्यक्तीमत्व. आमदार होण्याचे त्यांचे पहिले स्वप्न हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असतांनाच पूर्ण झाले होते. परंतु कालांतराने त्यांचे राज ठाकरे यांच्यांशी बिनसले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली. पण एका पक्षात पाच वर्षापेक्षा जास्त काळ थांबायचे नाही असा जणु जाधव यांचा दंडकच आहे की काय? असा प्रश्‍न पडतो. शिवसेनेतील स्थानिक नेत्यांवर आरोप करत लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. विशेषतः चद्रकांत खैरे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांनी चक्क लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यात महत्वाची भूमिका देखील बजावली. विधानसभेत त्यांना याची किंमत पराभवानेच चुकवावी लागली. परंतु लोकसभा निवडणुकीत जाधव यांनी घेतलेली 2 लाख 83 हजार मते ही महत्वाची आणि त्यांची ताकद सिध्द करणारी ठरली. 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात महत्वाची भूमिका घेत राजीनामा देणारे महाराष्ट्रातील पहिले आमदार होण्याचा मान देखील जाधव यांनी मिळवला होता. लोकसभा निवडणुकीत गल्लोगल्ली जाऊन हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे नेते, महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढत जोरदार प्रचार केला. अगदी कचरा प्रश्‍नावरूनही त्यांनी शिवसेनेची कोंडी केली होती. एकंदरित हर्षवर्धन जाधव यांचे हे उपद्रव मुल्य महापालिकेत मनसेच्या कामाला येऊन कदाचित या निवडणुकीत मनसेला आपले खाते उघडता येईल असे बोलले जाते. 

दाशरथे चमक दाखवणार ? 
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले सुहास दाशरथे महापालिका निवडणुकीत चमक दाखवणार का? हे ही पहावे लागेल. शिवसेनेत असतांना त्यांच्यांकडे काहीकाळ जिल्हाप्रमुख पद देखील होते. याशिवाय अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या. पण पक्षाची आंदोलन, बैठका, मेळावे, कार्यक्रम यात दाशरथे कधीच सक्रीय नव्हते. केवळ खैरे यांच्या आशिर्वादामुळेच त्यांना पक्षात पदे दिली जात असत असे देखील बोलले जाते. जुने शिवसैनिक म्हणून शहराच्या काही भागात त्यांना मानणारा एक वर्ग आहे. त्या जोरावर ते महापालिका निवडणुकीत मनसेला कितपत यश मिळवून देतात? यावर त्यांचे मनसेतील पुढील भवितव्य अवलंबून असणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com