औरंगाबादमधील मनसे पदाधिकारी सामुहिक राजीनाम्याच्या तयारीत ?

औरंगाबादमधील मनसे पदाधिकारी सामुहिक राजीनाम्याच्या तयारीत ?

औरंगाबाद : राज ठाकरे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व आणि शहरात तरुण कार्यकर्त्यांची भली मोठी फौज असून देखील औरंगाबादेतील मनसेला सध्या घरघर लागली आहे. अंतर्गत धुसफूस, वादावादी आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे मनसेचे पदाधिकारी संघटनेचा राजीनामा देऊन बाहेर पडत आहेत. दोन दिवसांपुर्वी जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे पाठवून दिला होता. पण मुंबईतील नेत्यांनी तो फारसा मनावर घेतला नाही. परिणामी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून येत्या काही दिवसांत हे सगळे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. 

जिल्ह्यात विशेषतः शहरात मनसेचा चांगला जम बसला होता. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महापालिकेत पक्षाला फारसे यश मिळालेले नसले तरी लक्षवेधी आंदोलनातून मनसेने प्रस्थापित राजकीय पक्षांना दखल घ्यायला भाग पाडलेले आहे. विशेषत शहरातील नागरी प्रश्‍नावर मनसेने महापालिकेच्या विरोधात केलेली आंदोलन शहरवासियांच्या चांगलीच लक्षात राहली. 

मनसेच्या दृष्टीने या जमेच्या बाजू असल्या तरी पक्षांतर्गत वादाची कीड या पक्षालाही लागलेली दिसते. काही महिन्यापुर्वी मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने जिल्हाध्यक्षावर आरोप करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नंतर हे प्रकरण मिटले. लोकसभा निवडणुकीनंतर मनसेत पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे यावेळी पण जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर हेच त्या मागचे कारण असल्याचे समजते. 

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुठल्याच पक्षाला पाठिंबा जाहीर केला नव्हता. त्यामुळे या निवडणुकी मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. पण जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी त्या भूमिकेला छेद देत आर्थिक व्यवहार केल्याची चर्चा आहे. जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले असले तरी या मागे पक्षांतर्गत नाराजी हेच प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हासंघटक सारख्या महत्वाच्या पदावरील व्यक्तीने राजीनामा दिल्यानंतर देखील याची दखल मुंबईतील नेत्यांनी घेतली नाही, यामगाची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. 

खांबेकर हटाव, मनसे बचावची मागणी 
संदीप कुलकर्णी यांच्या राजीनाम्याची दखल मनसेच्या नेत्यांनी घेतली नाही, त्याचे पडसाद शहरात उमटायला सुरूवात झाली आहे. मंगळवारी मनसेच्या वाहतूक, विद्यार्थी, चित्रपट, कामगार व शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक शहरात पार पडली. 70-80 पदाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्या कार्यपध्दतीबद्दल नाराजी व्यक्त करत " खांबेकर हटाव, मनसे बचाव' अशी भूमिका घेतली. खांबेकर यांच्या राजीनाम्याची मागणी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडे करण्याचे या बैठकीत ठरले असून पक्षाने याची दखल घेतली नाही, तर मात्र जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी आपल्या पदाचा सामुहिक राजीनामा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवणार असल्याचे बोलले जाते. 

या संदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करतो आहे. मी चुकीचं वागलो असतो तर पक्षाने माझ्यावर कारवाई केली असती. राहीला प्रश्‍न इतर पदाधिकाऱ्यांच्या अडचणीचा तर, त्या सोडवण्यासाठी नेते आहेत, त्यावर मी बोलणार नाही. जिल्ह्यात पक्ष वाढवण्याची जबादारी ही सगळ्यांची आहे. पद एकट्या माझ्याकडे नाही, सगळ्यांकडे आहे. तेव्हा अडचणीच्या काळात पक्ष वाढवणे गरजे आहे, मी ते करतोय. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com