उसाचे टिपरे हाती घेत मनसेचा " दंडुका मोर्चा '

उसाचे टिपरे हाती घेत मनसेचा " दंडुका मोर्चा '

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात सरकाने दुष्काळ जाहीर केला, पण प्रत्यक्षात उपाय योजना, अमंलबजावणी आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारला जाब विचारण्यासाठी मनसेने हातात ऊसाचे टिपूर घेऊन दंडुका मोर्चा काढला. शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चात यमरुपी मोर्चेकरी सहभागी झाले होते. रेड्यावर बसून मनसे कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध नोंदवला. मोर्चाला जमलेली तरुण कार्यकर्त्यांची गर्दी आणि अनोख्या आंदोलनामुळे मनसेने शरहवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. 

दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनतेचा आवाज सरकारच्या कानावर पोचवण्यासाठी मनसेने दंडुका मोर्चाचे आयोजन केले होते. या दंडुका मोर्चाचा मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जोरदार प्रचार देखील केला होत्या. शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून देखील मनसेने सोशल मिडियावर सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. 

आज दुपारी एक वाजता पैठणगेट येथून मनसेच्या दंडुका मोर्चाला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने तरूण कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना हे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी चक्क रेड्यावर बसलेला यमच मोर्चात आणला होता. महिनाभरापासून दंडुका मोर्चाची तयारी मनसेच्या वतीने सुरु होती. मोर्चाला मराठवाड्यातून शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे कार्यकर्त्यांच्या तयारीचे सार्थक झाल्याचे दिसून आले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर मनसेने काढलेला हा पहिलाच मोठा मोर्चा म्हणावा लागेल 

पैठणगेट परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चाची जय्यत तयारी केली. पण ऐनवेळी पोलीसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे काही काळ मोर्चेकरी थांबून होते. नंतर मोर्चा पुढे निघाला. 

या आहेत मागण्या ... 
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, पेन्शन, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण, स्वामीनाथन आयोग लागू करावा, गेल्या खरीप हंगामातील पिक विमा मिळावा, कोरडवाहु शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50जार, बागायतदारांना एक लाख अनुदान, गाव तेथे चारा छावण्या, मंडळानुसार नव्हे तर संपुर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, कृषिवीज बिले माफ करा, कर्ज न देणाऱ्या बॅंकांवर कारवाई करा, बोंडआळीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे, दुष्काळाची तीव्रता पाहता तातडीने पाण्याचे टॅंकर सुरू करावे, प्रतिव्यक्‍ती 50 लिटर पाणी द्यावे, रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत, उसाला एफआरपीप्रमाणे भाव, शैक्षणिक शुल्क माफी आदी मागण्या मनसेच्या वतीने सरकारला दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com