औरंगाबाद महापालिकेत मनसे 58 जागा लढवणार...

औरंगाबाद महापालिकेत मनसे 58 जागा लढवणार...

औरंगाबाद : एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. पक्षाने सर्व 115 वॉर्डातून उमेदवार देण्याची तयारी दर्शवली असली तरी आजच्या घडीला मनसेकडे 58 वार्डातील इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. राज्यात शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी केल्यामुळे या पक्षातील नाराजांना प्रवेश देऊन येणाऱ्या महापालिकेत चांगली कामगिरी करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. 

मनसेने आगामी महापालिका निवडणुकीत उतरण्याची जोरदार तयारी केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टीका केली गेली. त्यानंतर मनसेने कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत आपल्या पक्षाचा झेंडा आणि ध्येय धोरणे देखील बदलली. 9 फेब्रुवारी रोजी देशातील पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात काढण्यात येणार मोर्चा हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते. 

एप्रिल महिन्यात होणाऱ्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेच्या 115 वॉर्डांसाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर 58 वॉर्डांमधून निवडणुक लढवण्याची तयारी मनसेने केली आहे. या वार्डातून इच्छूक असललेल्यांची यादी देखील तयार करण्यात आली असून लवकरच ती पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. 

मनसेची पाटी कोरीच... 
औरंगाबाद जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सध्या मनसेची पाटी कोरीच आहे. जिल्हा परिषदेत एकमेव जिल्हा परिषद सदस्य हीच काय ती मनसेची कमाई. महापालिकेत मात्र मनसेला खातेही उघडता आले नव्हते. यावेळी मात्र मनसे महापालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणार असा दावा स्थानिक पदाधिकारी करतांना दिसत आहेत. गेल्या पाच वर्षात मनसेने नागरी प्रश्‍नावर अनेक आंदोलन महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केली होती. मात्र सातत्याचा अभाव आणि मुंबईतील नेत्यांची उदासिनता यामुळे मनसेला एक प्रबळ विरोधकाची भूमिका वठवता आली नाही. 
मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झालेले पहिले राज्यस्तरीय महाअधिवेशन आणि त्यानंतर आता 9 फेब्रुवारी रोजी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणारा मोर्चा यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्यासह मुंबईचे नेते किती लक्ष घालतात यावर मनसेचे यश अवलंबून राहणार आहे. 
राज ठाकरे येणार... 
मुंबईत पक्षाचे महाअधिवेशन झाल्यानंतर लगेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार होते. परंतु प्रकृती बिघडल्यामुळे आणि मुंबईतील मोर्चाच्या नियोजनात व्यस्थ असल्याने राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा रद्द केला होता. आता येत्या 12 किंवा 13 फेब्रुवारीला राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर येणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. या दौऱ्यात जिल्ह्यातील काही महत्वाचे शिवसेना-भाजप पदाधिकारी मनसेत प्रवेश करणार असल्याची देखील माहिती आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com