mlc satej patil on electricity bill | Sarkarnama

महाराष्ट्रातील वीजदर हे शेजारील सर्व राज्यांपेक्षा जास्त! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 जून 2019

उत्तर देताना उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्दिस्तरीय समितीची नेमल्याचे कबुल केले. पण अद्याप या समितीचा अहवाल आयोगास प्राप्त झाला नसल्याचे सांगितले.

कोल्हापूर : राज्यातील वीजदर शेजारील सर्व राज्यांपेक्षा जास्त असतानाही एप्रिल पासून वीजदरवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. सदरची वीजदरवाढ कमी करण्यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या, असा प्रश्‍न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केला.

महाराष्ट्रातील वीजदर हे शेजारील सर्व राज्यांपेक्षा जास्त आहेत. असे असतानाही राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार गेल्या एप्रिल महिन्यापासून वीजदरवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महावितरण आणि अदानीच्या देयकातील दरवाढ ही सरासरी टक्के होणार असली तरी प्रत्यक्ष वीजदेयकात इंधन समायोजन आकाराची भर पडणार आहे. घरगुती, औदयोगिक आणि कृषी पंपधारक वीज ग्राहकांवर दरवाढीचा भुर्दंड सहा टक्कयांपेक्षा जास्त होणार आहे. ही दरवाढ कमी करण्यासाठी संबंधितांनी शासन व महावितरणच्या विरोधात आंदोलनंही केली आहेत.

अदानी इलेक्‍ट्रिसिटी मुंबई या कंपनीने मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांना नियमित दरापेक्षा वाढीव दराने वीजदेयके आकारल्याचे स्पष्ट झाल्यावर शासनाने चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर वीज नियामक आयोगाने याबाबत चौकशी करण्यासाठी व्दिस्तरीय समिती नेमली. हे खरे आहे काय तसेच वीजदरवाढ कमी करण्यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या असा प्रश्‍न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्दिस्तरीय समितीची नेमल्याचे कबुल केले. पण अद्याप या समितीचा अहवाल आयोगास प्राप्त झाला नसल्याचे सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख