mla umesh katti likely to resign   | Sarkarnama

आमदार उमेश कत्ती बंडाच्या तयारीत; मंत्रिपद न दिल्यास राजीनाम्याचा इशारा 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करुनही दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने भाजपचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री उमेश कत्ती भलतेच संतापले आहेत.

बंगळूर : अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करुनही दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने भाजपचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री उमेश कत्ती भलतेच संतापले आहेत.

आपणास मंत्रिमंडळात योग्य स्थान न दिल्यास आमदारकीसह पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मी आठवेळा आमदारपदी निवडून आलो आहे. ज्येष्ठता विचारात घेऊन मला मंत्रिपद देणे आवश्‍यक होते. परंतु, पक्षाने माझी दखल घेतलेली नाही. आता मंत्रिपद न दिल्यास थेट आमदारपदाचा राजीनामा देईन, असे त्यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन सुनावले. 

माझ्या स्वाभीमानाला धक्का पोचल्यास मी क्षणभरही पक्षात राहणार नाही. बेळगावात आल्यानंतर उमेश कत्ती यांचे मंत्रिपद निश्‍चित असल्याचे तुम्ही जाहीर केले होते. मग, अखेरच्याक्षणी मला मंत्रिमंडळातून वगळण्याचे कारण काय, हेसुद्धा जाहीर करावे. माझ्यानंतर पक्षात आलेल्यांना तुम्ही मंत्रिपद देता. तुमच्यावर विश्वास ठेवून मी भाजपमध्ये आलो. निवडणुकीत पराभूत झालेल्या लक्ष्मण सवदींना केवळ मंत्रिपदच नाही तर उपमुख्यमंत्री केले. निवडून आलेल्यांना बाजूला सारुन पराभूतांना मंत्रिपद दिल्यास आम्ही का गप्प बसावे? चिल्लर लोकांना मंत्रिपद देण्याची आवश्‍यकताच काय होती? माझ्या अनुभवाला काहीच किंमत नाही का, अशा प्रश्नांचा भडीमार त्यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पांवर केला.

तुम्हाला मंत्रिपद देण्याची माझी तयारी होती. परंतु, सी. पी. योगेश्वर यांच्यामुळे तुम्हाला व लिंबावळी यांना वगळावे लागले, असे सांगून अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी तुम्हाला मंत्रिपदाची संधी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. परंतु, कत्तींनी ते मान्य केले नाही. मला ब्लॅकमेल करुन मंत्रिमंडळात येण्याची आवश्‍यकता नाही. आठवेळा आमदारपदी निवडून येऊन मंत्रीही झालो. मी धजदमध्ये असताना तुम्ही मला भाजपमध्ये बोलावून आणले. मग, तुमच्याकडूनच अन्याय होत असताना मी सहन कसे करावे? मी इतरांप्रमाणे ब्लॅकमेल करणारा राजकारणी नाही. माझ्या स्वाभिमानाला धक्का पोहोचल्यास करायचे तेच मी करतो. मला मंत्रिपद दिले नाही तर माझा राजीनामा निश्‍चित आहे, असे सांगून ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून रागारागाने बाहेर पडले.

सवदींची शिष्टाई असफल
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी उमेश कत्ती यांची समजूत काढण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यावर सोपवली होती. त्यानुसार मंत्री सवदी यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु, तो अयशस्वी ठरला. उमेश कत्ती राजीनामा देऊन बाहेर पडल्यास मुख्यमंत्रिपदाला धक्का पोहोचेल अशी भीती मुख्यमंत्र्यांना आहे. यासाठी ते संकट निवारणाच्या प्रयत्नात आहेत. कत्ती यांच्याप्रमाणेच आणखी काही आमदार बंडाच्या तयारीत असल्याचे समजते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख