MLA suspension history | Sarkarnama

आमदार निलंबनाच्या परंपरेत फडणवीस, महाजन, तावडे यांचाही समावेश;  1966 पासून आतापर्यंत 218 सदस्यांवर झाली होती निलंबनाची कारवाई 

महेश पांचाळ : सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 10 मार्च 2017

देवेंद्र फडणवीस : दोन वेळा निलंबित , 
शेतकरी आत्महत्या प्रकरणावरुन गोंधळ 
एकनाथ गायकवाड यांच्याविरोधात घोषणा केल्याप्रकरणी 2001 मध्ये निलंबित 

मुंबई  : सैनिकांच्या पत्नीबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी विधान परिषदेतील भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांना दिड वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

इतिहासात डोकावून पाहिल्यानंतर 1966 पासून आजपर्यंत तब्बल 218 आमदारांवर निलंबन केल्याचा तपशिल हाती लागला. त्यात तत्कालिन विरोधी पक्षातील देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, गिरीष महाजन, दिवाकर रावते आदी मातब्बर सदस्यांवरही यापूर्वी कारवाई झाली होती. 

विशेष म्हणजे, बहुतांश आमदार जनतेच्या प्रश्‍नांवर सभागृहात गोंधळ घातल्यामुळे निलंबित झाले होते. पण प्रशांत परिचारक यांनी मात्र सैनिकांच्या पत्नीबाबत केलेल्या निंदाजनक वक्तव्यामुळे ही कारवाई स्वतःवर ओढवून घेतली. 

यापूर्वी निंलबित झालेल्या आमदारांमध्ये सुधीर मुनगंटीवार, रवींद्र वायकर, विजय शिवतारे, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर यांच्याही नावांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य विधीमंडळात 31 ऑगस्ट 1966 मध्ये सीमाप्रश्‍नासाठी आक्रमक झालेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या 20 सदस्यांना पहिल्यांदा निलंबित करण्यात आले होते. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्‍नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 5 डिसेंबर 2006 मध्ये विधानसभेत आक्षेपार्ह फलक दाखवून प्रेतयात्रा काढली होती. या प्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण गिरीष महाजन यांच्यासह भाजपा आणि शेतकरी संघटनेच्या 10 सदस्यांना तीन दिवसांसाठी निलंबित केले होते.

तत्पुर्वी 13 डिसेंबर 2005 मध्ये अध्यक्षांच्या दालनात येवून उपाध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांना सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले होते. तसेच विनोद तावडे, दिवाकर रावते यांच्यासह तत्कालीन आमदार आणि विद्यमान सेना खासदार अरविंद सावंत यांना संसदीय पंरपरा पायदळी तुडवून विधान परिषदेच्या सभापतींचा अवमान केल्याप्रकरणी 16 जुन 2009 मध्ये तीन वर्षासाठी निलंबित केले होते.

तर सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी संजय राठोड, रविंद्र वायकर यांच्यासह पाच जणांना 1 डिसेंबर 2010 मध्ये एक वर्षाच्या कालावधीसाठी निलंबित केले होते. 24 मार्च 2011 मध्ये अर्थमंत्र्यांच्या भाषणात अडथळे आणणाऱ्या विद्यमान मंत्रिमंडळातील गिरीष महाजन, विजय शिवतारे, रविंद्र वायकर यांच्यासह सेना भाजपाच्या 9 विधानसभा सदस्यांना 6 दिवसासाठी निलंबित केले होते.

यापुर्वी निलंबित केलेल्या गोधळी सदस्यांची नावे 

1. देवेंद्र फडणवीस : दोन वेळा निलंबित , 
शेतकरी आत्महत्या प्रकरणावरुन गोंधळ 
एकनाथ गायकवाड यांच्याविरोधात घोषणा केल्याप्रकरणी 2001 मध्ये निलंबित 
2. गिरीष महाजन : चार वेळा निलंबित 
राज्यमंत्री एकनाथ गायकवाड यांच्याविरोधात घोषणा केल्याप्रकरणी 2001 मध्ये निलंबित, 
उपाध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा महिन्यासाठी निलंबित 
शेतकरी आत्महत्या प्रकरणी सभागृहात गोंधळ 
उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणात अडथळा 
3. गिरीष बापट : एक वेळ निलंबित 
एकनाथ गायकवाड यांच्याविरोधात घोषणा केल्याप्रकरणी निलंबित 
4. सुधीर मुनंगटीवार : एक वेळ 
शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी विधानसभेत प्रेतयात्रा काढल्याप्रकरणी निलंबित 
5. विनोद तावडे : विधानपरिषदेचे सभापतींचा अवमान केल्याप्रकरणी 3 वर्षासाठी निलंबित 
6. अर्जुन खोतकर: दोन वेळा निलंबित 
विधानसभा अध्यक्षांच्या टेबलावर हात आपटून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 2 एप्रिल 93 मध्ये आठ दिवसासाठी निलंबित 
विधानसभा तालिका अध्यक्षांच्या दिशेने टाचण्यांचा बॉक्‍स भिरकवल्याप्रकरणी 1 एप्रिल 2008 मध्ये एक वर्षासाठी निलंबित 
7. दिवाकर रावते: एक वेळा निलंबित 
विधानपरिषद सभापतीचा अवमान केल्याप्रकरणी 16 जून 2009 मध्ये 3 वर्षापासून निलंबित 
8. विजय शिवतारे : दोन वेळा निलंबित 
अर्थमंत्र्यांना भाषण करु न दिल्याप्रकरणी 24 मार्च 2011 मध्ये आठ दिवसासाठी निलंबित 
विधानसभा अध्यक्षांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी 19 एप्रिल 2011 रोजी एक दिवसासाठी निलंबित 
9.रविंद्र वायकर : 2 वेळा निलंबित 
विधानसभेत गैरवर्तन केल्याप्रकरणी 1 डिसेबर 2017 मध्ये एक वर्षासाठी निलंबित 
अर्थमंत्र्यांच्या भाषणात अडथळा आणल्याप्रकरणी 24 मार्च 2011 मध्ये आठ दिवसासाठी निलंबित 
10. गुलाबराव पाटील: 3 वेळा निलंबित 
मंत्र्याबाबत अनुदगार काढल्याप्रकरणी 15 डिसेंबर 1999 मध्ये 7 दिवसासाठी निलंबित 
बाळासाहेब ठाकरे यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ सभागृहाची मोडतोडप्रकरणी सहा महिन्यासाठी निलंबित 
11. उपसभापती माणिकराव ठाकरे : 30 जुलै 1996 , किणी मृत्यू प्रकरणी कापडी फलक घेवून घोषणा, आठ दिवसासाठी निलंबित

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख