MLA Sunil Bhusara Trying for Unappose Election in Mokhada | Sarkarnama

मोखाड्यात बिनविरोध निवडणुकीसाठी हालचाली; सुनील भुसारा यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा

भगवान खैरनार 
सोमवार, 30 डिसेंबर 2019

निवडणुका टाळून तालुक्‍यात सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, म्हणून मोखाड्यातील जिल्हा परिषदेच्या आसे, पोशेरा आणि खोडाळा या गटाच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचाली चार दिवसांपासून तालुक्‍यात सुरू आहेत. यासाठी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे

मोखाडा : पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत मोखाड्यातील तीनही जागा तीन प्रमुख पक्षांमध्ये बिनविरोध निवडून आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आसे गट राष्ट्रवादी, पोशेरा भाजप आणि खोडाळा गट शिवसेनेला या पद्धतीने जागावाटप ठरल्याचे बोलले जात असून, त्यासाठी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी पुढाकार घेऊन स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांबरोबर बैठका घेऊन हा तोडगा काढल्याची राजकीय चर्चा आहे. हा निर्णय सकारात्मक होण्याची शक्‍यता वर्तवली जात असून जिल्ह्यात एक नवा आदर्श आणि राजकीय पायंडा पाडला जाण्याची शक्‍यता आहे.

निवडणुका टाळून तालुक्‍यात सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, म्हणून मोखाड्यातील जिल्हा परिषदेच्या आसे, पोशेरा आणि खोडाळा या गटाच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचाली चार दिवसांपासून तालुक्‍यात सुरू आहेत. यासाठी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी पुढाकार घेऊन शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी बैठका घेऊन हा सुवर्णमध्य साधला असल्याचे बोलले जात आहे.

आसे गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार हबीब शेख यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार विश्‍वास चोथे माघार घेतील, पोशेरा गटात भाजपच्या राखी चोथे यांच्यासाठी शिवसेनेच्या वंदना चोथे माघार घेतील, तर खोडाळा गटात शिवसेनेच्या दमयंती फसाळे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी भाजपच्या झोले या माघार घेणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यासाठी सर्व पक्षांमध्ये एकमत झाल्याचे बोलले जात आहे.

नवा राजकीय पायंडा पडणार

मोखाड्यातील तीनही जागा बिनविरोध निवडून आल्यास जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळा आदर्श ठरणार असून सरकारी खर्च, वेळ, पैसा आणि वाद टाळणारा नवा राजकीय पायंडा पडणार आहे. याबाबत आमदार सुनील भुसारा यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही; तर स्थानिक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती, सोमवारी (ता. 30) अर्ज माघारीच्या दिवशी प्रत्यक्षात येणार असल्याची शक्‍यता वर्तवली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख