राज ठाकरे आणि कोल्हे यांच्या भेटीने आमदार सोनवणेंना डोकेदुखी

राज ठाकरे आणि कोल्हे यांच्या भेटीने आमदार सोनवणेंना डोकेदुखी

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्या काल मुंबईत झालेल्या भेटीने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांची धाकधुक वाढली आहे.  येत्या विधानसभेला मनसे राष्ट्रवादी युती झाल्यास सोनवणेंना ही युती धोकादायक ठरु शकते.

मनसेचे एकमेव आमदार ठरलेले आमदार शरद सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्याला फायदा होईल, या उद्देशाने केला होता. मात्र जुन्नर तालुक्याने आढळराव यांच्याविरोधात  कोल्हे यांना ४० हजाराचे मताधिक्य दिले. या मतदारसंघात कोल्हे यांचे मूळ गाव असलेले नारायणगाव आहे. तालुक्याने त्यामुळेच त्यांना भरभरून मते दिली. मनसेचा आमदार शिवसेनेत गेला असतानाही सेनेला मतदारांनी नाकारले. 

आमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाने विधानसभेसाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आणि सलद दोन वेळा विधानसभा शिवसेनेकडुन लढलेल्या आशा बुचके प्रचंड नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नाराजीचा फटका देखील आढळरावांना कमी मते मिळाल्याचा बसला असल्याची चर्चा आहे. 

दरम्यान लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत आघाडीचा आक्रमक प्रचार करणार असल्याचे खासदार कोल्हे यांनी यापुर्वीच जाहीर केले आहे. ठाकरे - कोल्हे यांच्या भेटीने अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडुन डाॅ. कोल्हे यांचे नाव उमेदवार म्हणुन चर्चेत होते. यावेळी शिवसेनेतील नाराज अशोक खांडेभराड यांना उमेदवारी दिली होती. हेच खांडेभराड आता आमदार सोनवणेंसह शिवसेनेत दाखल झाले आहेत.

जुन्नर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसकडुन अतुल बेनके यांचे नाव निश्चित समजले जात आहे. तर शिवसेनेकडुन आमदार सोनवणे यांचे नांव निश्चित असले तरी आशा बुचके विधानसभा लढविण्यावर ठाम असल्याने ही बाब शिवसेनेची आणि आमदार सोनवणेंची डोकेदुखी वाढवणार आहे. या सर्व घडामोडी अतुल बेनकेंना सुखावणाऱ्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com