भाजप उमेदवार कोण ? आमदार कर्डिले की सत्यजित कदम ?

Kardile-kadam
Kardile-kadam

राहुरी  : राहुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु, सत्ताधारी भाजपाच्या उमेदवारीसाठी विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले व देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 

कदम यांना भाजपाच्या उमेदवारीचे संकेत मिळाले आहेत. त्यांची प्रचार यंत्रणा रविवारपासून सक्रिय होत आहे. आता, आमदार कर्डिले काय भूमिका घेतात. शेवटच्या क्षणी उमेदवारी राखण्यात यश मिळवितात. की, अपक्ष लढतात. यावर चर्चा सुरू झाली आहे.

राहुरी मतदार संघात राहुरीचे तीन, पाथर्डीचे एक व नगर तालुक्याचे एक असे पाच महसूल मंडळांतून तीन लाख मतदार आहेत. राहुरी तालुक्यातील मतदार संख्या जास्त आहे. परंतु, मागील दोन निवडणुकांमध्ये नगर व पाथर्डी तालुक्यातील मतदान निर्णायक ठरले. राहुरीतील मतविभागणीचा फायदा कर्डिले यांना झाला.  

दहा वर्षानंतर प्रथमच कर्डिले यांना भाजपाची उमेदवारी राखण्यासाठी पराकाष्ठा करावी लागत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिढीजात निष्ठावंत माजी आमदार चंद्रशेखर कदम व उद्योजक जगदीश कदम यांनी सत्यजित यांच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दोन दिवसांपूर्वी धुळे येथे मंत्री गिरीश महाजन आमदार एकनाथ खडसे या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांना कदम यांच्या उमेदवारीचे संकेत मिळाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने कर्डिले यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यामार्फत भाजपात प्रवेश करुन उमेदवारी मिळविली होती. मागील पाच वर्षातील दांडगा जनसंपर्क व मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातील गावांत निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फौज. ही कर्डिले यांची जमेची बाजू आहे.

परंतु, राजकीय जीवनात त्यांना उमेदवारीसाठी सातत्याने संघर्ष करावा लागत आहे. 'भाजपाच्या 26 आमदारांची तिकिटे कापली जाणार आहेत. त्यात, कर्डिले यांचा नंबर आहे.' असा  प्रचार सुरू आहे. कदम यांचे कार्यकर्ते मतदार संघात कामाला लागले आहेत. आता, कर्डिले उमेदवारी राखण्यात यश मिळवितात? अपक्ष लढतात? की, पक्षासोबत राहतात. यावर मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.

 "भाजपाचा पिढीजात निष्ठावंत कार्यकर्ता आहे. राहुरी मतदार संघात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे, उमेदवारी मागणे गैर नाही. उमेदवारीचे संकेत मिळाले. परंतु, एबी फॉर्म मिळेपर्यंत काहीच निश्चित नसते. उमेदवारी मिळो. न मिळो. पक्षासमवेत एकनिष्ठ राहील." 

- सत्यजित कदम, नगराध्यक्ष, देवळाली प्रवरा.

"त्यांना उमेदवारीचे संकेत मिळाले की नाही. याची, मला माहिती नाही. जनतेच्या मनातील मी उमेदवार आहे. भाजपाच्या उमेदवारीवर माझा अग्रहक्क आहे. माझा पक्षश्रेष्ठींवर विश्वास आहे. त्यामुळे, माझी भूमिका सांगण्याचा प्रश्नच येत नाही."

 - आमदार शिवाजी कर्डिले, राहुरी. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com