संजय शिरसाट यांच्या कार्यालयात राडा ; शिवसेना शहरसंघटकास मारहाण

संजय शिरसाट यांच्या कार्यालयात राडा ; शिवसेना शहरसंघटकास मारहाण

औरंगाबाद : शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयात टेंडर भरण्याच्या कारणावरून शहर संघटक सुशील खेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. संजय शिरसाट यांच्या सांगण्यावरून त्यांच्या समर्थकांनी ही मारहाण केल्याचे बोलले जाते. पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील सातारा-देवळाई भागातील रस्त्याच्या कामाचे टेंडर भरण्याचा वाद आज दुपारी एक वाजेच्या सुमारास उफाळून आला. शिवसेनेचे शहर संघटक सुशील खेडकर यांनी या कामाचे टेंडर भरले होते. ते भरू नये यासाठी संजय शिरसाट यांच्याकडून त्यांच्यावर दबाव होता अशी माहिती समोर आली आहे. 

टेंडर भरण्याचा हा वाद गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होता, या संदर्भात संजय शिरसाट आणि खेडकर यांच्यात यापूर्वीच बैठक देखील झाली होती. शिरसाट यांनी सांगूनही खेडकर यांनी टेंडर भरल्यामुळे आज पुन्हा या दोघांमध्ये आधी फोनवरून वादावादी झाली. त्यानंतर शिरसाट यांनी खेडकर यांना आपल्या कोकणवाडी येथील संपर्क कार्यालयात बोलावून घेतले. सुशील खेडकर आपल्या काही कार्यकर्त्यासोबत दुपारी एक वाजेच्या सुमारास संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयात आले. तेव्हा पुन्हा टेंडरच्या विषयावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर आधी शिरसाट यांच्या कार्यालयात आणि त्यानंतर बाहेर सुशील खेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना शिरसाट समर्थकांकडून जबर मारहाण करण्यात आली. वीस ते पंचवीस जणांच्या घोळक्‍याने खेडकर व त्यांच्या साथीदांराना लाथा बुक्‍यांनी तुडवल्याचे बोलले जाते. 

अंबादास दानवेंची मध्यस्थी 
दरम्यान, शहरसंघटक सुशील खेडकर यांना मारहाण झाली तेव्हा आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे एका कामानिमित्त शिरसाट यांच्या कार्यालयातच आले होते. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची देखील तिथे उपस्थिती होती. शिरसाट यांच्यात वादावादी झाली तेव्हा दानवे यांनी दोघांनाही रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मारहाण झाल्यानंतर सुशील खेडकर यांनी पोलीस आयुक्त कार्यालय गाठून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेतली. तेव्हा संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्यास त्यांना सांगण्यात आले. त्यानूसार पोलीस संरक्षणात खेडकर यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात जाऊन संजय शिरसाट व त्यांच्या समर्थकांविरुध्द मारहाण केल्याची तक्रार नोंदवल्याचे समजते. या संदर्भात आमदार संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com