आमदार शरद सोनवणे यांचा जुन्नरमधील तीन कार्यालयांना टाळे लावण्याचा इशारा

आमदार शरद सोनवणे यांचा जुन्नरमधील तीन कार्यालयांना टाळे लावण्याचा इशारा

नारायणगाव : जुन्नर तालुक्‍यातील भूमी अभिलेख विभाग, तालुका कृषी विभाग व उत्पादन शुल्क विभाग या तीन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांची अडवणूक करत आहेत. या अधिकाऱ्यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला कंटाळून या कार्यालयांना तेरा आॅक्टोबर रोजी टाळे ठोकण्याचा इशारा आमदार शरद सोनवणे यांनी दिला आहे.

या बाबतच्या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवण्यात आल्या आहेत.

सोनवणे म्हणाले की जुन्नर येथील भूमी अभिलेख कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. मोजणीचे शुल्क भरून सुद्धा मोजणीची कामे केली जात नाहीत .नकाशे, अभिलेख कागदपत्र देण्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. जुन्नर येथील तालुका कृषी कार्यालयातून शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जात नाही. जुन्नर तालुका शेती प्रधान आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान,कीड नियंत्रण,खतांचा वापर या बाबतची माहीती कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी देणे अपेक्षित आहे.मा त्र कृषी विभागाचे अधिकारी,कर्मचारी कर्तव्य बजावत नाहीत.

नारायणगाव येथे उत्पादन शुल्क विभागाचे तालुका कार्यालय आहे. तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारूची विक्री केली जात आहे. गावोगावी अनधिकृत दारू विक्रीचे गुत्ते सुरू झाले आहेत. संबंधित विभागाचे निरीक्षक जुजबी कारवाई करतात. बेकायदेशीर दारू विक्रेत्यांकडून हप्ते वसूल करत असल्याचा आरोप आमदार सोनवणे यांनी केला असून या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करुण हक्कभंगाची कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी तालुक्‍यातील अधिकारी व नागरिक यांच्या समन्वय समितीची बैठक घेतली जाते. या बैठकीला तीन विभागाचे अधिकारी हजर राहात नाहीत. या बाबत समज देवून सुद्धा या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीत बदल होत नाही. संबंधित विभागाचे अधिकारी पैसे घेतल्या शिवाय सर्वसामान्यांची कामे करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केला.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com