आमदार राजेंद्र नजरधनेंनी जळत्या घरात शिरुन बालिकेला वाचविले

यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील सावलेश्वर येथे महाराष्ट्र दिनी आग लागून तीन घरे भस्मसात झाली. यावेळी 9 वर्षाची मुलगी सानिका सादलवाड हिला आगीने वेढा घातला होता. हे दृश्य उमरखेड चे आमदार राजेंद्र नजरधने यांना दिसताच कसलाही विचार न करता ते पेटत्या घरात शिरले आणि आगीच्या विळख्यातून सानिकाला सुरक्षित बाहेर काढले.
आमदार राजेंद्र नजरधनेंनी जळत्या घरात शिरुन बालिकेला वाचविले

नागपूर : यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील सावलेश्वर येथे महाराष्ट्र दिनी आग लागून तीन घरे भस्मसात झाली. यावेळी 9 वर्षाची मुलगी सानिका सादलवाड हिला आगीने वेढा घातला होता. हे दृश्य उमरखेड चे आमदार राजेंद्र नजरधने यांना दिसताच कसलाही विचार न करता ते पेटत्या घरात शिरले आणि आगीच्या विळख्यातून सानिकाला सुरक्षित बाहेर काढले. 

पहिल्या घराला आग लागताच दुसर्‍या घराला आग लागणार हे निश्‍चित होते. त्यामुळे घरातील सर्वजण महत्त्वाचे साहित्य वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होते. चिमुकली सानिका हीसुद्धा काही सामान फटाफट गोळा करीत होती. अशातच आगेचा गोळा घरात आला आणि सानिका अडकली. ही बाब लक्षात येताच, त्या ठिकाणी उपस्थित आमदार नजरधने यांनी क्षणाचाही विचार न करता घरत प्रवेश करून मुलीला बाहेर ओढले. त्यामुळे तिचे प्राण वाचले.

आगीत 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गावात पाणी फाउंडेशनने महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळे लोकांची या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याने आगीला विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. तरीही हवा वेगाने असल्याने आगीचा डोंब वाढत गेला. प्रकाश सादलवाड, शांताबाई सादलवाड व उत्तम माने यांच्या घरांना आगीने कवेत करून भस्मसात केले. कष्टाने उभारलले घर जळताना पाहून महिलांना अश्रू अनावर झाले होते. 

भाजप महिला आघाडीच्या मनीषा काळेश्वरकर,नागापूरच्या सरपंच सविता कदम, आशा देवसरकर या भगिनींनी त्यांना धीर दिला. पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम गावात असल्याने गावकरी गावात उपस्थित होते. अन्यथा, उन्हाच्या अगोदर पहाटेच शेतातील कामाला सुरवात होते. परिसरातील शासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जलमित्र यांनी आगीला विझविण्याचे प्रयत्न केले. गावात लोकांची, मदतीच्या हातांची संख्या मोठी असल्याने आगीने तीनच घरांना कवेत घेतले. अन्यथा, याहीपेक्षा मोठे नुकसान झाले असते. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार विजय खडसे, उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाणे, भाजप उमरखेड शहराध्यक्ष महेश काळेश्वरकर, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, उपविभागीय पोलिस अधिकारी विकास तोटावार, उमरखेडचे ठाणेदार अमोल किनगे, बिटरगावचे ठाणेदार विजय चव्हाण, तहसीलदार खंडारे, मंडळ अधिकारी राम पंडित, तलाठी शिवाजी कांबळे यांच्यासह परिसरातील जलमित्रांची गावात महाश्रमदानानिमित्त उपस्थिती होती. 

या सर्वांनी प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळविले.  उमरखेड येथून तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दरम्यान गावातील नागरिकांनी मिळेल तेथून पाणी आणून आग वाढू नये, यासाठी प्रयत्न केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी तसेच सुजाण नागरिकांनी तत्काळ मदत म्हणून 28 हजार 100 रुपये जमा केले. तर प्रशासनाने 15 हजार रुपयांची या तीन परिवारांना मदत केली. आमदार राजेंद्र नजरधने, उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाणे यांनी आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला. गावांत महाश्रमदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. अन्यथा ही संपूर्ण वस्ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती, अशी चर्चा गावकर्‍यांत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com