आमदार संजयमामा शिंदेंची पद्धत; जिकडे जेवण तिकडे पंगत

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्यानंतर भाजपला दिला होता पाठिंबा...आता पुन्हा सत्तेसोबत जाण्याचे संकेत
आमदार संजयमामा शिंदेंची पद्धत; जिकडे जेवण तिकडे पंगत

पुणे : करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे आपली राजकीय भूमिका टोपीप्रमाणे सहज बदलत असून जिकडे सत्ता तिकडे आपण जाणार असल्याचे उघडपणे सांगत आहे.

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला. आता भाजपचे सरकार येत नसल्याचे स्पष्ट होत असताना आपण सत्तेसोबत म्हणजे पुन्हा शिवसेना आणि दोन्ही काॅंग्रेसच्या आघाडी सरकारसोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नारायण राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते, यावरून सोशल मिडियात जोरदार खिल्ली उडविली जात असताना शिंदे यांच्यासारखे आमदार चलाखीने सत्तेसोबत राहत असल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी, सुरुवातीला भाजपाच्या पाठिंब्याच्या घेतलेल्या भूमिकेत आता बदल करत ज्याची सत्ता येईल त्यांच्यासोबतच आपण राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मूळ राष्ट्रवादीचे असलेले संजय शिंदे हे त्या पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणात ‘अजितनिष्ठ’ म्हणून राहिले. मोहिते-पाटीलविरोधी म्हणून त्यांनी मागील २०१४ साली करमाळा विधानसभा निवडणूक स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर लढविली होती. परंतु त्यांना यश आले नव्हते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या राजकारणात स्वत:ची पकड मजबूत करताना शिंदे यांनी मोहिते-पाटील गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्याच अजितनिष्ठांच्या छुप्या मदतीने भाजप पुरस्कृत महाआघाडी गठीत केली आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पदरात पाडून घेतले होते. अध्यक्षपद सांभाळताना त्यांचा भाजपशी संपर्क वाढला होता. दरम्यान, माढा लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारीसाठी आग्रह केला असता अचानकपणे शिंदे यांनी भूमिका बदलली आणि भाजपची साथ सोडून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीनेही त्यांना माढा लोकसभेची उमेदवारी दिली असता त्यांना दारूण पराभव पत्करावा लागला होता. पक्षाची उमेदवारी स्वीकारून चूक केल्याचे त्यांनी सांगितले.

हे विधान विसरायच्या आत त्यांनी पुन्हा राजकीय कोलांटी मारत राष्ट्रवादीची साथ सोडत करमाळा विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली. तेथे राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यायला लावली आणि राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना न मागता पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून येऊन देखील शिंदे हे पुन्हा भाजपच्या सोबत गेले. फडणविसांना भेटून भाजपला पाठिंबा दिला. भाजपची सत्ता येत नसल्याचे दिसताच सत्तेसोबत जाण्याचे जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com