आमदार संजय कदमांची आज रत्नागिरीच्या कारागृहातून सुटका 

दापोलीचे आमदार संजय कदम आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. त्यांना आज बुधवारी (ता. 24) रत्नागिरीच्या कारागृहातून सोडण्यात येणार आहे.
आमदार संजय कदमांची आज रत्नागिरीच्या कारागृहातून सुटका 

खेड : दापोलीचे आमदार संजय कदम आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. त्यांना आज बुधवारी (ता. 24) रत्नागिरीच्या कारागृहातून सोडण्यात येणार आहे. 

सोमवारी (ता. 22) आमदार संजय कदम व अन्य पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. सोशल मीडियावर आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ पोस्ट टाकण्यात अनेक जण आघाडीवर होते. खेड दिवाणी न्यायालयाने ठोठावलेली एक वर्ष सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती. त्याविरुद्ध आमदार संजय कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. 

पोलिसांना शरण आल्याशिवाय त्यांना जामीन मिळणार नव्हता. त्यामुळे त्यांनी सोमवारी खेड न्यायालयात स्वतःला अटक करून घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर आज मुंबईतील उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ना. बा. शेलार, पंचायत समितीच्या माजी सदस्य सुषमा विश्‍वास कदम, कार्यकर्ते हरिश्‍चंद्र लक्ष्मण कडू, प्रकाश गोपाळराव मोरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय भिकाजी जाधव यांना बुधवारी सोडण्यात येणार आहे. 

मुंबई उच्च न्यायालयात जामिनावर सुनावणी होणार असल्याने काल खेडमधून राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी पहाटेच मुंबईला गेले होते. जामीन मंजूर होताच त्यांनी न्यायालयाच्या बाहेर जल्लोष केला. या वेळी राष्ट्रवादीचे अजय बिरवटकर, जलाल राजपूरकर, नगरसेवक अजय माने, संभाजी देवकाते, संग्राम कदम, मिलिंद नांदगांवकर, अॅड. अश्‍विन भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com